मी मुख्यमंत्री होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, नाना पटोले यांचं वक्तव्य
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा समोर आली आहे.
Nana Patole On Chief Minister : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरुन (Chief Minister) राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सोबत आल्याने हेच मुख्यमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा समोर आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी (6 ऑगस्ट) औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारुती देवस्थानात दर्शन घेतले. सोबतच खुलताबाद शहरातील जरी जरी बक्ष या दर्ग्यावर देखील चादर चढवली. दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, "सध्या श्रावण महिना सुरु असून हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. तर, आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही. तसेच मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जातो." तसेच यावेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता, "अशी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, असे पटोले म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा नाना पटोले यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा समोर आली असल्याची चर्चा आहे.
जयंत पाटलांवर प्रतिकिया...
एकीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला असतानाच, दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील अमित शाहांना भेटल्याची चर्चा आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "राष्ट्रवादीत काय सुरु आहे हे आम्हाला बघण्याचं कारण नाही." आम्हाला जनतेची काळजी असल्याचे म्हणत राष्ट्रवादीवर बोलणे पटोले यांनी टाळले. तर, बाप हा बापच असतो, एक मुलाने गडबड केली तरी फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सरकारवर टीका...
दरम्यान याचवेळी पटोले यांनी राज्यातील सरकारवर देखील निशाणा साधला. "हे बधीर आणि नालायक सरकार आहे. भय आणि भ्रष्टाचाराच्या बळावर हे सरकार आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहे हे अध्यक्षांना देखील माहित नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, लोकशाहीचा गळा घोटणे सुरु आहे. आम्ही हे सगळं जनतेपर्यंत घेऊन जाऊ, आणि जनतेला सगळं सांगू," असे पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: