लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डाव टाकण्यास सुरवात; पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटलांना मिळाली मोठी जबाबदारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मुंबईत बैठक पार पडल्यानंतर लोकसभेसाठी स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती समजून घेण्यासाठी निरीक्षक व समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.
Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डाव टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. इचलकरंजी काँग्रेसचे शहराध्यक्ष शशांक बावचकर यांना रत्नागिरी मतदारसंघासाठी, कोल्हापूरसाठी अभय छाजेड आणि हातकणंगलेसाठी रणजित देशमुख यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक पार पडल्यानंतर लोकसभेसाठी स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती समजून घेण्यासाठी निरीक्षक व समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत निमंत्रित करून तसा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवायचा आहे.
काँग्रेस एका जागेसाठी इच्छूक
राज्यात सलग दोन राजकीय भूकंप झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पार खिचडी होऊन गेली आहे. अभेद्य वाटणारी महाविकास आघाडी कोलमडून पडली आहे. ठाकरे गटाच्या दोन्ही खासदारांचे बंड, त्यानंतर फुटीर अजित पवार गटातून हसन मुश्रीफ मंत्री झाल्याने जिल्ह्यातील चित्र बदलले आहे. आजघडीला जिल्ह्यात काँग्रेसची ताकद सर्वाधिक असल्याने कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतचे सुतोवाच आमदार सतेज पाटील यांनीही केले आहेत. मात्र, जागावाटपावर अजून कोणतीही चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेली नाही. त्यामुळे अजून कोणतीही स्पष्टता आली नसली, तरी ठाकरे गटाकडे सक्षम पर्याय नसल्याने ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, भाजपकडून कोल्हापूर लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे या जागेवर शिंदे गट आणि अजित पवार गटही दावा करणार की भाजपने जोरदार तयारी केल्याने आपल्या पदरात पाडून घेणार? याबाबतही अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. कोल्हापूर लोकसभेची महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची सुद्धा उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या