मोठी बातमी! मंत्री संदिपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, 'या' मुद्यांवर झाली चर्चा?
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला पायी मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुमरे आणि जरांगे यांच्या चर्चा देखील झाली. तर, याचवेळी जरांगे यांनी आपल्या काही मागण्या भुमरे यांच्यामार्फत सरकारकडे केल्या आहेत.
शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सोबतच तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. याबरोबरच जरांगे आणि भुमरे यांच्यात मराठा आरक्षणावरून देखील चर्चा झाली. दरम्यान, निष्पाप मराठ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आंदोलन काळात अपघातात मयत झालेल्या मराठ्यांना मदत करण्यात यावी, RTO परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात आणि सारथीबाबतचे प्रश्न तातडीने सोडवावे, अशा मागण्या जरांगे यांनी सरकारकडे केल्या आहेत.