Maratha Reservation : अशोक चव्हाणांना घेरलं, प्रशांत बंब यांना सुनावलं, तर बागडेंच्या विरोधात घोषणाबाजी; मराठा आरक्षणावरून तरुणांमध्ये नेत्यांबद्दल रोष
Maratha Reservation : मागील दोन-तीन दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहेत.
![Maratha Reservation : अशोक चव्हाणांना घेरलं, प्रशांत बंब यांना सुनावलं, तर बागडेंच्या विरोधात घोषणाबाजी; मराठा आरक्षणावरून तरुणांमध्ये नेत्यांबद्दल रोष Maratha Reservation Protest youth from Maratha community angry against political leaders over Maratha reservation Maratha Reservation : अशोक चव्हाणांना घेरलं, प्रशांत बंब यांना सुनावलं, तर बागडेंच्या विरोधात घोषणाबाजी; मराठा आरक्षणावरून तरुणांमध्ये नेत्यांबद्दल रोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/11/3635ef794775eb19dd486e8e6f6f2e211694431720768737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, याच उपोषणास्थळी पोलिसांनी लाठीमार केल्याने आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. त्यामुळे राज्यभरात आंदोलन केले जात असून, सकल मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून राजकीय नेत्यांना देखील प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्रभर मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्यांना जाब विचारू लागलाय. केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकही यातून सुटले नाहीत. मागील दोन-तीन दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता राजकीय नेत्यांना जाब विचारला जात आहे. भाजप आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना देखील अशाच रोषाचा सामना करावा लागला. आडगाव सरक येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी बागडे आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी त्यांना आंदोलकांनी धारेवर धरलं. विधिमंडळात जाऊन मराठा आमदार काय करतात? मराठा आरक्षणाचा मुद्दा का मार्गी लागत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच एका उपोषणकर्त्याने हाताला लावलेली सलाईन काढून फेकली. तसेच यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गावकऱ्यांच्या विरोध पाहता बागडे यांनी त्यांची समजूत काढण्याचा पर्यत केला. मात्र, गावकऱ्यांच्या रोषापुढे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.
दुसरीकडे भाजप आमदार प्रशांत बंब आणि काँग्रेस नेते तथा माजी मुख्यंमत्री अशोक चव्हाण यांना देखील अशाच रोषाचा सामना करावा लागला. गंगापूर तालुक्यातील एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्याला शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान यावेळी रुग्णाची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या आमदार बंब यांना आंदोलनकर्ते यांनी चांगलेच सुनावले. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घालत जाब विचारला. तसेच काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी देखील केली. अनेक राजकीय नेत्यांना असाच रोषाचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा समाजातील तरुणांना नेत्यांवर विश्वास नाही का?
जरांगे यांनी सुरू केलेलं उपोषण आता गावागावात जाऊन पोहोचले आहे. अनेक गावात लोकं उपोषण करत आहेत. आपल्या मतदारसंघातील उपोषण म्हणून नेते तिथे भेट देतात. मात्र, तिथेही त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कारण, गेल्याव्ळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डझनभर नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामे दिले होते. मात्र, मागील अडीच वर्षे महाविकास आघाडीची आणि आता शिंदे फडणवीस सरकारची सत्ता आहे. परंतु सत्तेत असल्यावर आरक्षणाचा मुद्दा राजकीय नेत्यांना दिसत नाही. विरोधात गेले की, आरक्षण महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच तरुणांचा आता या नेत्यांवर विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)