Manoj Jarange : 'एडपट, माझ्या नादी लागू नको'; मनोज जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
Manoj Jarange : छगन भुजबळ यांनी खोटं बोलून स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद आणखीनच वाढला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दरम्यान, आज पुन्हा एकदा जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. “भुजबळांचा एडपट असा उल्लेख करत, माझ्या नादी लागू नको” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "तुम्ही अनेकांना अंगावर घेतले असेल. मी देवेंद्र फडणवीस आणि अजित दादाला सांगितलं आहे की, भुजबळ तुम्हाला अडचणीत आणतील. भुजबळ यांनी त्यांच्या वाटेचं खावं, उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेर शायरी करू नयेत. काहीही बोलतात, त्यांनी माझ्या नादी लागू नयेत. तर, भुजबळ यांनी खोटं बोलून स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे."
फडणवीसांवर टीका...
सरसकट गुन्हे मागे घेता येणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटले असून, त्यावर देखील जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “फडणवीस यांनी गुन्हे मागे घेऊ असे सांगितले होते. सरसकट गुन्हे मागे घेऊ असेही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांना गुन्हे मागे घ्यावेच लागेल. जे निष्पाप आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून आतमध्ये टाकले जात आहे. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी हे घडवल गेलं आहे. आज तुम्ही अन्याय करा, पुढे आम्ही ते लक्षात ठेवणार आहोत. आम्हाला आशा आहे की, तुम्ही गुन्हे मागे घेणार. ज्यांनी काही केलं असेल त्यांना आमचे समर्थन नाहीच. पण, गोरगरिबांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजावर असा अन्याय करू नका. त्यामुळे आणखीनही फडणवीसांनी विचारपूर्वक बोलावं, मराठा समाजाबद्दल चांगले शब्द वापरावे. तुम्ही कसा अन्याय करत आहात हे मराठ्यांनी मनात कोरून ठेवले आहे," असेही जरांगे म्हणाले.
खोट्या केसेस करून नाराजी वाढवू नका.
देशात फक्त मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे खऱ्याअर्थाने ओबीसीमध्ये मराठे आहोत. आम्ही तुमच्या बाबतीत कधीच काही म्हंटले नाही, फक्त जळू नका. याला (छगन भुजबळ) कितीही वळवळ करू द्या, त्याचं सरकारने एकु नयेत. खोट्या केसेस करून नाराजी वाढवू नका. यांना संताजी-धनाजी सारखे मी आणि मराठा समाज पाण्यात दिसू लागलो, त्याला मी काय करणार, असेही जरांगे पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष वाढतोय, कारण....नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील