Sanjay Shirsat: मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाटांचं वक्तव्य. अमृता फडणवीसांनी बुधवारी मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर सफाई मोहीम राबवली. यानंतर लोढा यांनी त्यांचे कौतुक केले. यावर संजय शिरसाटांनी आपले मत मांडले आहे.
छत्रपती संभाजीनगर: अमृता फडणवीस यांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरुन कौतुक करताना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचा उल्लेख 'माँ' असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी कुणाला काय म्हणून हाक मारावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या विषयावर शिरसाट यांनी अधिक बोलणे टाळले. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय शिरसाट यांनी महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, गणपती विसर्जन झाले असून आता दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठका सुरु होतील. कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा आणि नावे जाहीर होणार. नेते या सगळ्याबाबत घोषणा करणार आहेत. मजबूत सरकार आणण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, मात्र, कोण मुख्यमंत्री होणार, हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
उद्यापासून या बैठकांना सुरुवात होईल. प्रथम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होईल. वरिष्ठांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही शिरसाट यांनी म्हटले.
मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा, शिरसाट म्हणाले...
भाजप नेते गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे म्हटले होते. यावरुन महायुतीत पु्न्हा मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरु झाला होता. मात्र शिरसाट यांनी म्हटले की, पडळकर यांच्या मनात अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, तर माझ्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिरसाट यांनी सांगितले.
मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?
मी अमृता फडणवीस यांना विनंती करतो की, तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करतात हे चांगली गोष्ट आहे. मात्र, राज्यातील राजकारणात जो कचरा आलेला आहे तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार