'सातव्या मजल्यावरून उडी मारू म्हणणारे भुमरे म्हणतात...' मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास एका मिनिटात राजीनामा देईल
Maharashtra Politics Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी एका मिनिटांचा सुद्धा विलंब लावणार नसल्याचे भुमरे म्हणाले.
Maharashtra Politics Crisis : राज्याच्या राजकारणात जेवढी चर्चा पवार काका पुतण्याच्या वादाची आहे, तेवढीच चर्चा शिंदे गटातील नाराज आमदारांची आहे. कारण अजित पवारांच्या (Ajit Pawar) एन्ट्रीने अनेक शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अशी कोणतेही नाराजी शिंदे गटात नसल्याचा दावा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितल्यास मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी एका मिनटांचा सुद्धा विलंब लावणार नसल्याचे भुमरे म्हणाले.
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादावादी झाली का? या प्रश्नाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाचे नेतेमंडळी होते. तर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली. ज्यात आमदारांमध्ये कोणतेही बाचाबाची झालेली नाही. काल पहिल्यांदा एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली. पक्ष आणि विकास यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच मंत्र्यांनी राजीनामे देऊन इतरांना संधी द्यावी याबाबत कालच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे यावेळी ठरवण्यात आले. त्यामुळे मला जर राजीनामा देण्याचं सांगितल्यास मी एका मिनिटात राजीनामा देऊन टाकेल. कारण शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यापुढे कोणीच नाही. त्यामुळे त्यांनी सांगितल्यास राजीनामा द्यायला एका मिनटांचा देखील विलंब लागू देणार नसल्याचे भुमरे म्हणाले आहेत.
'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू'
2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे हे, जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाच्या निर्णयात भुमरे यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास एका मिनिटात राजीनामा देईल असे म्हणणाऱ्या भूमरेंच्या सातव्या मजल्यावरून उडी मारू या वक्तव्याची पुन्हा चर्चा होत आहे.
संबंधित बातमी:
Politics:'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू' म्हणणारे भुमरेही नॉटरिचेबल