Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर होणार 'टपऱ्या मुक्त शहर'; महानगरपालिका राबवणार मोहीम
Chhatrapati Sambhaji Nagar : रस्त्यावर टपऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे धोरणच महापालिका राबविणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) अतिक्रमण विरोधात महानगरपालिकेकडून सतत कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान अशात आता शहरातील रस्त्यावरील टपऱ्याही काढण्याच्या सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर रस्त्यावर टपऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे धोरणच महापालिका राबवणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाने सिडको-हडकोतील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जात आहे. त्याचप्रमाणे शहराच्या इतर भागांतही अतिक्रमण काढणे सुरुच आहे. त्यात आता रस्त्यावर टपऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे धोरणच महापालिका राबवणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी अनौपचारिकपणे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, "सध्या मनपाच्या विविध विभागांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेच्या मर्यादित करावीच लागतील. त्यासाठी सिस्टिममध्ये बदल करावा लागणार आहे. ऑनलाईन सिस्टिम राबवण्यावर भर दिला जाणार असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले. मराठवाड्याच्या राजधानीचे हे शहर आहे. या शहरात राबवली जाणारी मोहीम मराठवाड्याच्या इतर शहरात देखील राबवली जाते. त्यामुळे हे शहर स्वच्छ आणि सुंदर कसे राहिल याकडे लक्ष दिले जाईल. यापुढे रस्त्यावर टपऱ्या टाकण्यास मनपाची परवानगी मिळणार नाही, असे धोरण राबवले जाणार असल्याचे श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर मनपा आरोग्य विभागाच्या वतीने 24 मे रोजी "शासकीय योजनांची जत्रा" अंतर्गत सिडको एन-8 महानगरपालिका बॉटनिकल गार्डन या ठिकाणी सकाळी 7 ते सकाळी 10 या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. यासाठी प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, नाक, कान, व घसा तज्ञ यांचेमार्फत मोफत तपासण्या करण्यात येईल. तसेच आभा (ABHA- Ayushman Bharat Health Account) कार्ड नोंदणी आणि आरोग्य संबंधी विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. या शिबीरासाठी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद, ई-लाईट या संस्थेने कॅल्शियमच्या 1000 गोळ्या दिल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: