छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्याला बेड्या; गुन्हे शाखेची कारवाई
Chhatrapati Sambhaji Nagar : गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत अखेर शहरात मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या
Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या दीड महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar City) मोटरसायकलवर येऊन मंगळसूत्र चोरीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खास करून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यामुळे मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख अविनाश आघाव यांच्या अधिपत्याखाली दोन पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने कारवाई करत अखेर शहरात मंगळसूत्र चोरीचा धुमाकुळ घालणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या साथीदारांचं शोध घेतला जात आहे. तर योगेश सीताराम पाटेकर (वय 24 वर्षे, रा. श्री स्वामी समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण (रा.स्वामी समर्थ नगर परिसर, छत्रपती संभाजीनगर), अक्षय त्रिभुवन (रा. गोंदवणी पुलाजवळ, ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) राहुल बरडे (रा. भोकर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) असे या आरोपींचे नावं असून, योगेशला अटक करण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना पाहता गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर व अमोल म्हस्के यांचे दोन पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान या पथकाने सिसिटीव्ही फुटेज तपासून, तांत्रिक विश्लेषण करुन, आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन, आरोपींचा येण्या-जाण्याच्या मार्ग काढून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान मोटरसायकलवर फिरुन मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरी चोरून नेणारा आरोपी योगेश सीताराम पाटेकर असल्याची माहिती पथकाला गुप्त बातमीदाराने दिली. पोलिसांनी योगेश पाटेकरची अधिक माहिती काढली असता तो शहरातील स्वामी समर्थ नगरच्या मळ्याच्या पाठीमागे भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
आपसांत समान हिस्से करायचे
योगेश पाटेकरला ताब्यात घेऊन मंगळसूत्र चोरीप्रकरणी त्याची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले. ज्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील एकुण 8 चोरीचे मंगळसूत्र त्याच्या ताब्यातून घेण्यात आले. या आरोपीने म्हाडा कॉलनी, तिसगाव येथून चोरलेली युनिकॉर्न गाडीवरुन तसेच, श्रीमरामपुर येथून चोरलेली हिरो कंपनीची सीडी डिलक्स (CD DELUXE) मोटरसायकवरून मंगळसूत्र चोरले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी चोरी केल्यानंतर सोन्याचे वजन करुन हे आरोपी आपसांत समान हिस्से करुन वाटून घेत होते. तर याच आरोपींनी चोरीचे सोने योगेश बाबुराव नागरे नावाच्या सोनाराला चोरीचे सोनं विकले होते. त्यामुळे पोलिसांनी सोनाराचे ताब्यातून विक्री केलेले सोने जप्त केले आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, अमोल म्हस्के, पोउपनि रमाकांत पटारे, सतिश जाधव, सुधाकर मिसाळ, संजय नंद, रविंद्र खरात, सुनिल बेलकर, संदीप राशिनकर, महेश उगले, नितीन देशमुख, अजय दहिवाळ, नितेष सुंदर्डे, धनंजय सानप, शुभम वीर, महिला अंमलदार प्राजक्ता वाघमारे, अनिता त्रिभुवन, पुनम पारधी, आरती कुसळे, गीता ढाकणे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: