आंबेडकर जयंती! छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
.Chhatrapati Sambhaji Nagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही ठिकाणी उद्या वाहतुकीसाठी रस्ते बंद असणार असून, त्यासाठी पर्याय मार्ग सुचवण्यात आले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar : 14 एप्रिल रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील असाच उत्साह पाहायला मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे वेगळं नातं होते. बाबासाहेबांनी काही दिवस या शहरात घालवले होते. त्यांच्या अनेक आठवणी या शहरासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे 14 एप्रिलला शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. दरम्यान मिरवणुका देखील काढण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील वाहतूक (Traffic) काही बदल केले आहेत. काही ठिकाणी उद्या वाहतुकीसाठी रस्ते बंद असणार असून, त्यासाठी पर्याय मार्ग सुचवण्यात आले आहेत. तर शहरात मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमीत्त उद्या (14 एप्रिल) छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 6 वाजेपासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत विविध ठिकाणी रॅली व मिरवणुका काढतात. त्यापैकी मुख्य मिरवणुक क्रांतीचौक येथुन सुरु होवुन पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, मुख्य पोस्ट ऑफीस मार्गे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ विसर्जित होते. तसेच सिडको भागातही रॅली व मिरवणुका निघतात. तर या मिरवणुका पाहण्यासाठी शहर व परिसरातुन मोठया संख्येने नागरीक एकत्र येतात. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर नागरीकांची व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ निर्माण वाहतूककोंडी होण्याची शक्यता असल्याने, वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद
- महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते अमरप्रित चौक
- गोपाल टी- क्रांती चौक- सिल्लेखाना- पैठणगेट- बाराभाई ताजिया - गुलमंडी- सुपारी हनुमान मंदिर- उत्तम मिटाई भंडार- सिटीचौक- जुना बाजार- मुख्य पोस्ट ऑफीस - भडकल गेट.
- शहागंज- गांधीपुतळा- सराफा - सिटीचौक.
- औरंगपुरा पोलीस चौकी ते बाराभाई ताजिया.
- मिल कॉर्नर ते भडकल गेट.
- एन 12 नर्सरी - गोदावरी पब्लिक स्कुल- टि.व्ही. सेंटर- एन-9- अयोध्यानगर- शिवनेरी कॉलनी- एन-7 शॉपिंग सेंटर या मिरवणुक मार्गावरील वाहतुक मिरवणुक सुरु असे पर्यंत एकेरी मार्गावरुन वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग असे असणार आहे.
- जळगावकडून येणारी वाहने ही हर्सुल टी- जळगाव टी- जालना रोड- अमरप्रित चौक- दर्गा चौक- गोदावरी टी- महानुभव आश्रम चौक- रेल्वेस्टेशन चौक- महाविर चौक (बाबा पेट्रोल पंप) मार्गे जातील व येतील.
- सतिष मोटार्स, सावरकर चौक, निरालाबाजार, औरंगपुरा या मार्गाने जातील.
- चेलीपुरा, कामाक्षी लॉज, महानगरपालिका कार्यालय या मार्गाने जातील.
- दिल्लीगेट कडुन येणारी वाहने ही टाऊन हॉल उड्डाणपुलाखालुन- मकईगेट- बेगमपुरा - विद्यापीठ मार्गे पुढे जातील. बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील.
- या सूचना पोलीस, रुग्णवाहीका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. या अधिसुचनेचा भंग करणारी व्यक्ती मो. वा. कायदा, म.पो. कायदा कलम 131 व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.
इतर महत्वाच्या बातम्या :
शहरातील शांतता भंग करणाऱ्या दोघांना एमपीडीएखाली स्थानबद्ध; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई