मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : यंदा अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने अनेक ठिकाणी दुष्काळ (Drought) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच, जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे.
यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. अशात जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), अहमदनगर (Ahmednagar), जालना (Jalna) जिल्ह्यासह औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. सध्या जायकवाडी धरणात 38.42 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून 4 आवर्तने दिली जातात. मात्र, यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
मराठवाड्यात एकूण 216 टँकरने पाणीपुरवठा...
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यात (Marathwada) सध्या 216 टँकरने (Tanker) पाणीपुरवठा केला जात आहे. 156 गाव आणि 41 वाड्यावर एका शासकीय आणि 215 खाजगी टँकरने हा पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 105, जालना 110 आणि बीड जिल्हयात 1 असे एकूण 216 टँकरने मराठवाड्यात पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आठवड्यात हा आकडा वाढतांना पाहायला मिळत आहे.
जालना शहराचा सतत पाणीपुरवठा विस्कळीत
जालना शहरात (Jalna City) मागील काही दिवसांपासून सतत नागरिकांना पाणी प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. कधी पाईपलाईनचा व्हॉल्व फुटणे, कधी लाईट कट करणे आदी कारणांवरून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पैठण- जालना मार्गावर गस्त सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी ते जालन्यापर्यंत पाईपलाईन किंवा व्हॉल्व फुटल्यास त्याची तात्काळ दुरूस्ती व्हावी म्हणून जालना महानगरपालिकेने चार कर्मचाऱ्यांचे एक गस्ती पथक तयार केले आहे. हे पथक पैठण - जालना मार्गावर फिरतीवरच असते, कुठे पाण्याची गळती, व्हॉल्व फुटलेले दिसल्यास हे पथक तात्काळ त्याची दुरूस्ती करते. या पथकाकडे आवश्यक साधनसामग्री देखील उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pandharpur News: दुष्काळाची दाहकता यंदा जास्त जाणवणार; आजपासून पंढरपुरात पाणीकपातीला सुरुवात