नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर हादरलं! चोवीस तासांत 2 नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : विशेष म्हणजे घाटीत अनेक औषधांचा तुटवडा असल्याचे अनेकदा समोर आले असून, आजही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली असतानाच, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून, ज्यात 2 नवजात बालकांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे घाटीत अनेक औषधांचा तुटवडा असल्याचे अनेकदा समोर आले असून, आजही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणावे लागत आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यानेच हे मृत्यू झाल्याचे आरोप होत आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात देखील 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या कारणांनी हे मृत्यू झाले असून, यात दोन नवजात बालकांचे देखील समावेश आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. विशेष म्हणजे रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा असल्याचे आरोप होतात. या रुग्णालयात 120 प्रकारचे औषधे लागतात. परंतु, यातील अनेक औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी देऊन बाहेरून औषध आणण्यासाठी सांगितले जाते. तर, घाटीत आजघडीला रेबिज लस, अँटिबायोटिक्स, सलाइनसह विविध प्रकारची औषधे उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी रुग्णालय स्थिती?
- घाटी रुग्णालयातील एकूण खाटा : 1 हजार 177 खाटा
- प्रत्यक्ष भरती राहणारे रुग्ण : 1500 ते 1700 रुग्ण
- दररोज होणाच्या प्रसुती : 50 ते 70
- रोजची ओपीडी : 1500 ते 2 हजार
- रोजची आयपीडी :150 ते 200
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका
नांदेड येथील घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. “सरकार अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार आहेत. मागिल 24 तासांत नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये 24 निरपराध रुग्णांचा योग्य सुविधा अभावी जीव गेला आहेत. यामध्ये 12 नवजात बालकांचा सुद्धा समावेश आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी ठाणे येथे घडली होती. त्याचे दुःख अजुन संपलेच नाहीतर ही मनाला वेदना देणारी दुसरी घटना घडली आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहेत. हापकिनने कमतरता असून सुद्धा औषधांची खरेदी केलेली नाहीत. अशा औषधांच्या तुटवड्यामुळे निरपराधात नागरिकांचा बळी जात असून नांदेड सारख्या घटनांना सर्वस्वी सरकार जबाबदार आहेत, असे दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: