संभाजीनगरमध्ये बिल्डरचं अपहरण, निर्वस्त्र करुन पट्ट्याने मारलं, सहकाऱ्यालाही डांबून ठेवत जबर मारहाण
Chhatrapati Sambhajinagar Crime : विधानसभेची निवडणूक लढवणारा संदीप शिरसाट व त्यांच्या साथीदारांनी बिल्डरचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : विधानसभेची निवडणूक लढवणारा संदीप शिरसाट व त्यांच्या साथीदारांनी शरद राठोड नामक बिल्डराला अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. राठोड यांच्या सहकाऱ्यालाही या टोळीने मारले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरातील गुंडगिरीचा धुमाकूळ समोर आला आहे. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुत्र संदीप भाऊसाहेब शिरसाट (रा. सुधाकरनगर), त्याचा भाऊ पोलीस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद भवसिंग राठोड (33, रा. कुमावतनगर, देवळाई चौक) हे बांधकाम व्यावसायिक असून आहेत. त्यांची अभिजित ऊर्फ बंटी बर्डे (28) याच्याशी मैत्री आहे. बंटी पूर्वी आरोपी शिरसाटकडे शासकीय बांधकामाच्या टेंडरमध्ये सहायक म्हणून काम करत होता. मात्र संदीपकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे त्याने राठोड यांच्या कार्यालयात काम सुरू केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. तसेच त्यांनी नग्न करून पट्ट्याने दोघांना मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंदुकीचा भाग दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
संदीप शिरसाटला अटक
संदीपने राठोड यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली. यानंतर बर्डेला कॉल करून माझ्या दुचाकीचे पेट्रोल संपले आहे. तू लवकर ये असे सांगण्याचे संदीपने राठोडना फर्मावले. अभिजित पेट्रोल घेऊन आल्यानंतर संदीपच्या कार्यकर्त्यांनी अभिजितला पकडून आलिशान गाडीमध्ये आणले. त्यानंतर त्यालासुद्धा मारहाण करत त्याचा लॅपटॉप घेतला. अभिजितचे शर्ट आणि पँट जबरदस्तीने काढून घेतले गेले. तिथे दोघांनाही बेदम मारहाण केली. रविवारी पहाटे सातारा परिसरात सुधाकरनगर भागात घडलेल्या या प्रकाराबाबत फिर्यादीने थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. यात 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप शिरसाट यास अटक करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या

























