Chhatrapati Sambhajinagar Crime : मोबाईल शुटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणी रुममधून बाहेर गेल्यानंतर शूटिंग करण्यासाठी मोबाईल ठेवला आणि टोकाचे पाऊल उचलले. ही घटना सिडको एन-7 मध्ये बुधवारी 30 जुलै रोजी दुपारी घडली. 21 वर्षीय मुलीने नेमके टोकाचे पाऊल का उचलले याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेकॉर्डिंगसाठी ठेवलेला मोबाईल फॉरेनसीक विभागाकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचं नाव कल्याणी परमेश्वर वायाळ (21) असून ती जालना जिल्ह्यातील सावरगाव वायाळ, पिंपरखेड येथील रहिवासी होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही शेतकरी कुटुंबातील होती आणि औषधशास्त्र (D. Pharmacy) या शाखेत शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वीच ती शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आली होती. ती साई इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीमध्ये तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. सिडको एन-7 परिसरात तिने तिच्या तीन मैत्रिणींसोबत भाड्याने खोली घेतली होती आणि तिथेच वास्तव्यास होती.
रूममध्ये गळफास घेत आत्महत्या
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कल्याणी आणि तिच्या मैत्रिणींनी रुममध्ये मिळून स्वयंपाक केला. जेवण तयार झाल्यानंतर सर्व मैत्रिणी डबा घेऊन महाविद्यालयात गेल्या. मात्र, कल्याणी यावेळी रुममध्येच थांबली आणि महाविद्यालयात गेली नाही. दुपारी मैत्रिणी परत आल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र तो आतून उघडला गेला नाही. कल्याणीला आवाज देऊन हाक मारली असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता, कल्याणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे
याबाबतची माहिती मैत्रिणींनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडून कल्याणीला खाली उतरवण्यात आलं आणि घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं. आत्महत्या करण्यापूर्वी कल्याणीने मोबाईल खोलीतील एका फळीवर उभा करून ठेवला होता. मोबाईलची स्थिती पाहता, तो रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ कॉलसाठी ठेवला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मोबाईल लॉक असल्यामुळे नेमकं काय घडलं, याचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, संबंधित मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासासाठी सुपूर्त केला असून, त्याच्या तपासातून खऱ्या घडामोडी उघड होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Nanded Crime : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
























