Nanded Crime : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
Nanded Crime : नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

Nanded Crime : नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी (Nanded Police) तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती आणि ते अनेक वेळा भेटले होते. अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी वाद घातला होता.
पोलिसांनी मुलीला सुखरूप शोधलं
त्या वादानंतर एक आरोपी आपल्या मित्रासोबत आला आणि दोघांनी मिळून तिला दुचाकीवरून बळजबरीने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने तपासाला लागले. पोलिसांचा दबाव वाढत असल्याने आरोपींनी मुलीला सोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली.
एका आरोपीला अटक
त्या मुलीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हिंगोली शहरात भरदिवसा युवकावर चाकूने हल्ला
दरम्यान, हिंगोली शहरात देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर दिवसा युवकावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन तरुण कारमधून येत अचानक चाकूने हल्ला करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. हा हल्ला कशामुळे झाला ही याबाबतची माहिती अजून समजू शकली नाही. हिंगोली शहरातील जवाहरलाल रोडवर ही घटना घडली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. तर पोलिस जखमींचा जबाब घेत असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आणखी वाचा
























