Chhatrapati Sambhajinagar: अनधिकृत बॅनर्स काढताना आयुष्याची अन् संसाराची राखरांगोळी; छत्रपती संभाजीनगरात मनपा कर्मचाऱ्याचा शॉक लागून अंत, एक जखमी
या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत बॅनर्स काढण्याची कारवाई एका तरुण कर्मचाऱ्यासाठी जीवघेणी ठरली. मुकुंदवाडी परिसरात हनुमान मंदिरावरील होर्डिंग काढताना लोखंडी फ्रेम 33 केव्ही वीज तारेच्या संपर्कात आल्याने महापालिकेचा कर्मचारी अमोल दिनकर जाधव (वय 27) यांचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत रवी रणधीर रिडलॉन (वय 38) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास घटना
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर लावलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू होती. सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कर्मचारी लोखंडी फ्रेम असलेले होर्डिंग खाली उतरवत होते. होर्डिंग काढल्यानंतर त्याची लोखंडी फ्रेम जवळून जाणाऱ्या 33 केव्ही वीज तारेच्या संपर्कात आली. यामुळे अमोल जाधव यांना तीव्र विजेचा धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत रवी रिडलॉन हेही जखमी झाले आहेत.
कुटुंबीयांचा आक्रोश, चौकशीची मागणी
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे जाधव यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस भरती सरावादरम्यान काळाचा घाला
पोलीस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) या 20 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवि अंत झाला आहे. सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे सराव करण्यासाठी घराबाहेर पडला, मात्र, परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने पाचोड पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृत्यूदेह आढळून आला आहे.

























