धक्कादायक! रेल्वे स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये मिळतायत खराब अन्नपदार्थ; असा झाला भांडाफोड
Chhatrapati Sambhaji Nagar : कॅण्टीनच्या किचनमध्ये तपासणी करताना त्यांना टोमॅटो चॉप मसाला खराब असतानाही वापरला जात असल्याचे दिसून आले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) रेल्वे स्थानकावर (Railway Station) असलेल्या कॅन्टीनमध्ये खराब मसाल्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीनंतर रेल्वे बोर्डाच्या प्रवाशी सेवा सुविधा समितीने सोमवारी अचानक रेल्वेस्थानकावर पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या फूड ट्रकमधील गैरसोय आणि खराब झालेले अन्नघटक पाहून पाहणीसाठी आलेल्या समितीने कॅन्टीन चालकाला धारेवर धरले. पण यावेळी कॅन्टीन चालकाने खराब अन्न फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या समितीच्या एका सदस्याने कॅन्टीन कुकचा हात पिरगाळत चक्क कानाखाली लगावली, तसेच संबंधित कॅन्टीनला सील ठोकत बंद करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
रेल्वे प्रवासी सेवा सुविधा समितीने सोमवारी (10 एप्रिल) अचानक रेल्वे स्थानकावर पाहणी केली. दरम्यान कॅन्टीनच्या किचनमध्ये तपासणी करताना त्यांना टोमॅटो चॉप मसाला खराब असतानाही वापरला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या समिती सदस्यांनी चालक आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत झापले. तसेच कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्याचे आणि सील करण्याचे निर्देश समितीने अधिकाऱ्यांना दिले.
अन् कॅन्टीन चालकाच्या कानाखाली वाजवली...
पॅसेंजर अॅमेनिटीज कमिटीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके, कैलास वर्मा, विभाश्री अवस्थी, अभिजित दास, सुनील राम यांनी सोमवारी अचानक रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांची तपासणी केली. दरम्यान यावेळी त्यांनी स्थानकावरील विविध स्टॉल्सद्वारे विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव पाहिली. तसेच दरपत्रकांची खात्री केली. पण याचवेळी काही सदस्यांनी कॅन्टीनच्या किचनमध्ये तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. कारण यावेळी चक्क खराब अन्न पदार्थ याठिकाणी आढळून आले. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या समिती सदस्यांचा पारा चढला. विशेष म्हणजे कॅन्टीन चालकाने खराब अन्नपदार्थ फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या समिती सदस्यांनी कॅन्टीन चालकाच्या कानाखाली वाजवली. तसेच संबंधित कॅन्टीन सील केली.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ....
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा प्रवासी रेल्वे स्थानकावर थांबल्यावर कॅन्टीनमध्ये नाश्ता, जेवण करतात. पण याच कॅन्टीनमध्ये अक्षरशः खराब झालेलं अन्नपदार्थ विकले जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यात हे सर्व घडत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
रस्त्यावरून ब्रँडेड कंपनीचे टी-शर्ट विकत घेताय तर होऊ शकते फसवणूक, पाहा नेमकं काय घडलं?