Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : 'वेडा झाला, काही दिवसांनी कागदं खाणार'; मनोज जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका
Manoj Jarange : जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, याच ठिकाणी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही नेत्यांकडून सतत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. "छगन भुजबळ वेडे झाले आहेत, त्यामुळे ते काही दिवसांनी कागदं खातील" असे जरांगे म्हणाले. जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, याच ठिकाणी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा, अजूनही सुधरा भुजबळ साहेब, अन्यथा तुम्हाला शॉक बसायचा. तुम्हाला जर झटका बसला तर मला खूप टेन्शन येईल. आम्हाला एवढा चांगला माणूस पागल होऊ द्यायचा नाही. मला खूपच वाईट वाटत आहे. काय झालं असेल बरं तुम्हाला, सांगा तरी, गिरीश महाजन यांना देखील सांगितलं त्यांना घेऊन जा म्हणून, पण त्यांना देखील भुजबळ हे वेडे व्हावे वाटत आहेत. एवढा मोठा माणूस काय बोलतो. कोयता, कुऱ्हाडी आणि लाठ्याची भाषा करणारे संस्कार शिकवणार आहे का?, आमची संस्कृती कशाला काढता. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं पाहू. धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका का स्पष्ट करत नाही. काही दिवसांनी भुजबळ कागद खातील, असेही जरांगे म्हणाले.
सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे
मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात, लढ्यात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला पायी चालायची आणि मुंबईला यायची हौस नाही, असेही जरांगे म्हणाले.
समाजाला फसवणार नाही
एकदा आंतरवालीच्या बाहेर पाय टाकलं तर मग माघारी नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचं नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहे. त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही. तयारी आता पूर्ण होत आली असून, आम्ही सज्ज आहोत. तसेच, जनता मागे आहे म्हणून भावनेच्या आहारी काहीही निर्णय घेऊन समाजाला फसवणार नाही.
शेतातील कामं उरकून मुंबईला निघणार...
मुंबईला जाण्यापूर्वी आम्हाला आमचे काही उरलेले काम देखील संपवून जावे लागणार आहे. आम्हाला दोन अंग आहेत. मराठा असलो तरी आम्ही शेतकरी देखील आहोत. त्यामुळे शेतात लावलेल्या पिकांचे अजून 20-30 टक्के कामे शिल्लक राहिली आहे. कापूस वेचणी बाकी आहे, गहू-ज्वारीच्या पिकांना पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे 20 तारेखेच्या आधी हे सर्व कामं उरकून आम्ही मुंबईला निघणार आहे. पुढे मग मुंबईला कितीही दिवस थांबण्याची गरज पडल्यास चिंता राहणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: