Chandrakant Khaire : अंबादास दानवेंच्या ऐवजी विनोद पाटलांना होती विधानपरिषदेची ॲाफर; खैरेंचा मोठा गौप्यस्फोट
Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांच्या दाव्यामुळे मराठवाड्याचा राजकारणात खळबळ उडाली आहे.
Chandrakant Khaire Secret Blast : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातील अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकामागून एक गौप्यस्फोट आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंच्या (Ambadas Danve) ऐवजी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांना (Vinod Patil) विधानपरिषदेची ॲाफर होती असा दावा खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या दाव्यामुळे मराठवाड्याचा राजकारणात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले खैरे?
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपूर्वी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ऐवजी विधानपरिषदेची ॲाफर होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनोद पाटील यांना प्रथम पसंती होती. यावेळी विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची विचारणा सुध्दा झाली होती. परंतु, विनोद पाटील यांनी समाजाच्या प्रश्नासाठी काम करायचे असल्याचे सांगत विधानपरिषदेसाठी नकार दिला होता. तर, विनोद पाटील यांनी नकार दिल्यानेच अंबादास दानवे यांना संधी मिळाली असल्याचे खैरे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, दानवे यांच्या निवडणुकीची जबाबदारी सुद्धा विनोद पाटील यांच्यावरच सोपवली होती अशीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे खैरे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.