Aurangabad : रस्त्यावरून पायी जाताना फोनवर बोलतायत; मग तुम्हालाही बसू शकतो आर्थिक फटका, ते कसं पाहा?
Mobile : नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून दुचाकीवरून फरार होणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद : अनकेदा आपण रस्त्यावरून पायी जात असतांना फोनवर बोलताय. मात्र, तुमची हीच सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण औरंगाबादमध्ये नागरिकांच्या हातातून मोबाईल (Mobile) हिसकावून दुचाकीवरून फरार होणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या आरोपीकडून चोरीच्या नऊ मोबाईलसह गुन्हे करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, हे आरोपी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या हातातून मोबाईल हिसकावून धूम ठोकायचे. सुमित सुभाष रुपेकर आणि सलीम रमजान शहा (दोघेही रा. साजापूर) अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी मयूर भावसार हे हडको कॉर्नर भागातून मोबाईलवर बोलत पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन केलं होतं. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाला हा मोबाईल सुरेश रामअवतार कुशवाह नावाचा तरुण कुशवाहला साजापूर परिसरातून वापरत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सुरेशला मोबाईलसह ताब्यात घेतले. यावेळी त्याने हा मोबाईल त्याला आरोपी सुमित रुपेकर आणि सलीम शहा यांनी विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून सुमित रुपेकर आणि सलीम शहाला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ विविध नऊ मोबाईल हँडसेट आढळून आले. मयूर भावसार यांचा मोबाईल हिसकावल्याची देखील त्यांनी कबुली दिली. सोबतच, विविध नागरिकांचे इतर हँडसेटदेखील त्यांनी हिसकावल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी सिडको पोलिसांकडे सोपवले आहे.
पायी जाणारे नागरिक टार्गेटवर...
वरील आरोपींकडून पायी जाणाऱ्या लोकांना टार्गेट केले जात होते. रस्त्याने फोनवरून बोलत जात असताना, अचानक दुचाकीवरून येऊन बेसावध असलेल्या व्यक्तीच्या हातून मोबाईल हिसकावून धूम ठोकण्याची पद्धत या आरोपींची असल्याचे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, पायी चालणाऱ्या व्यक्तीकडे मोटारसायकल नसल्याने तो चोरांच्या माघे धावू शकत नाही. तोपर्यंत हे चोरटे पसार होऊन जायचे.
यांनी केली कारवाई...
पोलिसांनी कुशवाह, रुपेकर आणि सलीम शहाला अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, एसीपी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडुळे, अझर कुरेश, पोपटराव मनगटे, संजय नंद, कैलास काकड, संतोष भानुसे आणि काकासाहेब अधाने आदीनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :