लोकसभा निवडणुकीत 'औरंगाबाद नामांतरा'चा मुद्दा पुन्हा गाजणार; नेत्यांकडून आतापासूनच आरोप-प्रत्यारोप
Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांकडून 'औरंगाबाद नामांतरा'वरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात कोणतेही निवडणूक असो, नामांतराच्या मुद्याशिवाय ती निवडणूक होतच नसल्याचे चित्र अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. मात्र, आता जिल्ह्याचा नामांतराची मागणी पूर्ण झाली असून, औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूक हा मुद्दा नसेल असे वाटत असतानाच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांकडून 'औरंगाबाद नामांतरा'वरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यांनी नामांतरावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली, त्यांच्या याच टीकेला ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.
काय म्हणाले फडणवीस?
छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपची जाहीर सभा झाली. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "या शहराचे नाव संभाजीनगर असावे, अशी घोषणा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यांचे पुत्र मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे त्यांना या शहराचे नाव संभाजीनगर करावे, असे वाटले नाही. त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी हा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजूर करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना दानवे म्हणाले की, “
संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी? मग 2014 ते 2019 सालात आपण मुख्यमंत्री होतात. तेव्हा का हा निर्णय झाला नाही?, शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती, त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे. ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमचा त्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली होती. लोकांना हे माहिती आहे की, कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा, असे दानवे म्हणाले.
नामांतरावरून अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर टीका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नामांतर करण्यासाठी जे लोकं विरोध करत होते, ते बाळासाहेबांचे वारस असू शकतात असे म्हणत अमित शाहांनी ठाकरेंवर टीका केली. तर, आज उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, आज ज्यांच्यासोबत ते गेले आहेत त्यांनी 370 कलम हटवण्यासाठी विरोध केला होता. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय रोखून धरण्याचे काम देखील त्या लोकांनी केल्याचं शाह म्हणाले.
संजय राऊतांचे प्रत्युत्तर
अमित शाह यांच्या याच टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लाज तुम्हाला वाटली पाहिजे, अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि जनतेचं मनोरंजन करतात. आजही 370 कलम हटवल्यावर हजारो काश्मिरी पंडित आपल्या राज्यात निर्वासिताच जीवन जगतायत, असे राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :