Aurangabad Crime News : मित्रांनीच केला मित्राचा घात, 500 रुपयांच्या उधारीवरून झाला होता वाद
Aurangabad Crime News : पाचशे रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादानंतर तरुणाला त्याच्या मित्रांनीच पाण्यात ढकलून दिल्याचे समोर आले आहे.
Aurangabad Crime News : मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या तरुणाचा बांधकामाच्या खड्ड्यात पडल्यावर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी औरंगाबाद (Aurangabad) शहरात समोर आली होती. एन-6 सिडकोतील यशवंतराव चव्हाण हायस्कूलजवळ रात्री साडेदहा वाजता ही घटना समोर आली होती. मात्र हा सर्व प्रकार संशयित वाटल्याने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले आणि मित्रांनीच मयत तरुणाला पाण्यात ढकलल्याचे समोर आले आहे. मनोज राजेंद्र अकोलकर असे मयत तरुणाचे नाव असून, पाचशे रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादानंतर त्याला त्याच्या मित्रांनी पाण्यात ढकलून दिल्याचे समोर आले आहे. तर अमोल अशोक गायकवाड आणि अभिषेक रमेश पंडित असे आरोपींची नावे आहे.
सिडकोतील एन-सहा परिसरातील एका रिकाम्या फ्लॅटवर मित्रांसोबत दारू पिणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मित्रांनी दिलेले पाचशे रुपये मयत मनोज अकोलकर याने परत दिले नाही म्हणून त्याला प्लॉटवर असलेल्या खड्डयातील पाण्यात ढकलून दिले होते. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी सोबतच्या दोन्ही तरुणांना अटक केली आहे. अमोल अशोक गायकवाड आणि अभिषेक रमेश पंडित असे आरोपींची नावे आहे.
एन-सहा येथील मनोज हा रसवंतीवर काम करून कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी हातभार लावायचा. त्याचे आई-वडिलही रोजंदारीने काम करतात. त्याला दोन भाऊ आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मनोज अकोलकर हा रविवारी (9 जुलै) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तीन मित्रांसह बाहेर पडला. सर्वजण दारू पिण्यासाठी घरापासून जवळच असलेल्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पाठीमागे गेले. तेथे बांधकामासाठी फ्लॅटवर मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. 20 ते 25 फूट खोल खड्डा असून, पाण्याने खड्डा फूल भरलेला आहे. दरम्यान याच ठिकाणी मनोज अकोलकरसोबत त्याचे दोन मित्र अमोल अशोक गायकवाड आणि अभिषेक रमेश पंडित पार्टीला बसले. मनोजकडे अमोल गायकवाड याचे पाचशे रुपये बाकी होते, वारंवार मागणी करूनही मनोज देत नव्हता. त्यामुळे अमोल याने रागाच्या भरात मनोजला मारहाण करून त्या खोल खड्यात ढकलून दिले. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला.
पहिल्यापासूनच प्रकरण संशयास्पद वाटत होते...
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र अधिक चौकशी केल्यावर आणि घटनास्थळी पाहणी केल्यावर पोलिसांना सर्व प्रकरण संशयास्पद वाटले. त्यामुळे त्यांनी मनोजच्या सोबत असलेल्या मित्रांची चौकशी केली. दरम्यान पाचशे रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादातून या दोन्ही मित्रांनीच मनोजला ढकलून दिल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: