Aurangabad : गांजाचे व्यसन असलेल्या निवृत्त क्लर्कने पत्नीला संपवलं; डोक्यात बॅट घालून चाकूने केले वार
Aurangabad Crime News : या प्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, गांजाचे व्यसन असलेल्या निवृत्त क्लर्कने पत्नीची हत्या (Murder) केली आहे. डोक्यात बॅट घालत चाकूने वार करून आरोपीने पत्नीचा खून केला आहे. शहरापासून जवळ असलेल्या कांचनवाडी परिसरात आज (11 जुलै) सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संगीता सुखदेव सोलनकर (वय 37 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तर सुखदेव बापूराव सोलंकर (वय 60 वर्षे रा. कांचनवाडी) असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुखदेव सोलनकर वाल्मी येथे क्लर्क म्हणून नोकरीला होता. दीड दोन वर्षांपूर्वी तो रिटायर झाला. त्याला तीन बायका आहेत. तर मयत संगीता या तिसऱ्या नंबरची पत्नी होती. विशेष म्हणजे आरोपीची पहिली पत्नी व मयत संगीता या बहिणी आहेत. या दोघी सवती एकत्र राहतात. पहिल्या पत्नीला दोन मुली तर संगीताला एक मुलगा व एक मुलगी आहे. आरोपी दोन बायका आणि मुलांसह कांचनवाडीत राहतो. आज सकाळी संगीताचे दोन्ही मुले शाळेत गेली होती. तर सावत्र मुलगी घरी होती. दरम्यान कोणत्यातरी कारणावरून सुखदेवचा संगीताशी वाद झाला. या वादात त्याने संगीताला बॅटने मारहाण केली. तसेच चाकूचे घाव घातले. या हल्ल्यात संगीता यांचा जागीच मृत्यू झाला.
वडील मारहाण करत असल्याचे पाहून घरात असलेल्या सावत्र मुलीने आरडाओरोड केली. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. तेव्हा आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी याची माहिती सातारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मयत संगीताला घाटी रुग्णालयात दाखल केले. तर आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन केली. तर काही तासात पोलिसांनी शेतात लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तीन लग्ने केले..
आरोपी सुखदेव सोलनकर हा वाल्मी येथे क्लर्क म्हणून सरकारी नोकरीला होता. पहिल्या पत्नीला दोन मुली झाल्यानंतर त्याने दुसरी बायको केली. मात्र ती जास्त दिवस राहिली नाही. ती माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीचीच बहीण संगीता हिच्यासोबत त्याने संसार थाटला. दोघी बहिणी एकत्र राहत होत्या. पहिल्या पत्नीला एक अठरा वर्षाची तर एक सोळा वर्षाची मुलगी आहे. तर मयत संगीता हिला एक पंधरा वर्षाची दहावीत शिकत असलेली मुलगी तर बारा वर्षाचा मुलगा आहे.
आरोपीला दारू गांजाचे व्यसन...
तीन बायका असलेल्या आरोपी सुखदेव याला दारू व गांजाचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनाला कंटाळून दुसऱ्या नंबरची बायको त्याला कायमची सोडून निघून गेली. दारू अथवा गांजा पिऊन घरी आल्यावर त्याच्या अंगात राक्षस संचारत असे. तो बायका व मुलांना मारहाण करीत होता असे आजूबाजूचे रहिवासी सांगतात.
इतर महत्वाचे बातम्या:
Aurangabad : शेतीच्या वादातून वाद झाला, लहान भावाने केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा घात झाला