(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधुनिक सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करावी; औरंगाबादचा 'आदर्श घोटाळा' अधिवेशनात गाजला
Ambadas Danve : आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली.
Aurangabad Adarsh Scam : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा समोर आला असून, तब्बल 210 कोटींचा हा घोटाळा आहे. दरम्यान औरंगाबादचं हा 'आदर्श घोटाळा' (Adarsh Scam) आज अधिवेशनात देखील गाजला. औरंगाबाद येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आधुनिक सावकारी केली आणि शेतकऱ्यांच्या 210 कोटी रुपयांची लूट केली आहे. अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात सरकारकडे केली.
कागदपत्रांची कोणतीही योग्य प्रकारे पडताळणी न करता औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेने कर्जदारांना कर्ज वाटप केली. ज्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे 210 कोटी रुपये पतसंस्थेत अडकून राहिले. एक प्रकारे या बँकेने अशा पद्धतीने आधुनिक सावकारीच सुरू केली होती, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक-2023 सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधान परिषद सभागृहात सादर केले. या विधेयकावर दानवे यांनी सहकार संस्थेचे विधेयक आणताना त्यात काही सूचना करत हे विधेयक कडक करण्याची मागणी केली.
आदर्श नागरी पतसंस्थेने ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता, साक्षीदारांचा कुठला पुरावा न घेता तसेच अनेक ठिकाणी बँकेच्या मॅनेजरची स्वाक्षरी सुद्धा नसताना कर्ज वाटप केले. परिणामी ही बँक बुडीत निघाली. ज्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले आहेत. यावर आता सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या सहकारी पतसंस्था बँकांवरती नियंत्रण आणण्यासाठी सरकार काय उपयोजना करणार आहेत. तसेच ठेवी व ठेवीदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सूचना दानवे यांनी सरकारला केल्या.
कसा झाला 'आदर्श घोटाळा'?
उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे समोर आले. तसेच ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील यातून समोर आले. तर यात एकूण 200 कोटींचा घोळ असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर अंबादास मानकापेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Adarsh Scam : 'माझे वय झालं, काहीच आठवत नाही', 'आदर्श घोटाळा' करणाऱ्या मानकापेचं पोलिसांना अजब उत्तर