शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
Abdul Sattar On Farmer Suicide : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर यातील तीन शेतकरी खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सत्तार यांनी दिलेलं उत्तर संताप आणणारं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहेत. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली असल्याचं देखील सत्तार म्हणाले.
मागील आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. या नुकसानीची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यानंतर बोलताना सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.
तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सत्तार यांचा सोयगाव तालुका वगळण्यात आला आहे. यावर बोलताना सत्तार म्हणाले की, मी आज सोयगावला जाऊन पाहणी केली. दिवसभर सोयगाव तालुक्यात होतो. शेतीचे फार नुकसान झाले नाही. मात्र जे काही नुकसान झाला आहे त्याबाबत पंचनामे करण्याचे कृषी विभागाला सांगितले गेले आहे. अजून अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीच शेतकऱ्यांना भरपाई मिळणारच असेही सत्तार म्हणाले.
विरोधक आक्रमक होण्याची शक्यता!
यापूर्वी देखील अब्दुल सत्तार वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा अडचणीत आले आहे. तर त्यांना माफी देखील मागावी लागली होती. त्यातच आता शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरून सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, उद्या सभागृहात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सत्तार यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात.