Congress : महाराष्ट्रात काँग्रेस फुटणार? वडेट्टीवार म्हणतात, तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार नाही
Congress : आम्ही एकवेळ तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार असल्याची स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

चंद्रपूर : शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेसनंतर (NCP) आता काँग्रेसमध्ये (Congress) फूट पडणार असल्याची चर्चा सुरू असताना राज्याचे काँग्रेस (Congress) नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्पष्टच भाष्य केले आहे. आम्ही एकवेळ तुरुंगात जाऊ पण भाजपमध्ये जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. भाजपने (BJP) देशात द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे, काँग्रेस फुटण्याचा मुहूर्त रोज सांगितला जात होता, मात्र आम्ही 7 राज्यांसारखी महाराष्ट्रात काँग्रेस फुटू दिली नाही, असेही त्यांनी म्हटले.
घुग्गुस येथे आयोजित एका सत्कार समारंभात बोलतांना वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं. याच कार्यक्रमात बोलतांना वडेट्टीवार यांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. पालकमंत्री असलेले सुधीरभाऊ लोकसभा उमेदवारीबाबत गोंधळून गेले असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठविण्याचा निश्चय केला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात आपल्या माणसांच्या तिकिटासाठी भोजनावळी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात मागील वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेची ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाले. तर, काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतही बंडाळी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने शरद पवार यांना आव्हान दिले. आता, अजित पवार यांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी कोणाची यावर आता निवडणूक आयोगात संघर्ष सुरू आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाप्रमाणे पसंतीक्रम न दिल्याने प्रथम प्राधान्याचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, आता विजय वडेट्टीवार यांनी आम्ही तुरुंगात जाऊ पण भाजपात जाणार नसल्याचे वक्तव्य केले.
उपोषण सोडवताना जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन पाळावे
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 24 ऑक्टोबरच्या अल्टीमेटमवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपोषण सोडविताना जरांगे पाटील आणि सरकार यांच्यात जी चर्चा झाली, जे आश्वासन दिले त्याप्रमाणे त्यांना आरक्षण दिले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशीच आहे. मात्र ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावे असेही वडेट्टीवार म्हणाले.























