VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Sudhir Mungantiwar : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या प्रश्नांसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतल्याचं सांगितलं. त्यावरून आता चर्चा सुरू आहेत.

चंद्रपूर : हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार... चंद्रपूरच्य राजकारणातले दोन बडे नेते. दोघेही एकाच पक्षातले अर्थात भाजपमधले. मात्र या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रचंड वाद आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात या दोन नेत्यांच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. आधी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. त्यानंतर लगेचच हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनीही दिल्ली गाठली आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा ( J P Nadda) यांची भेट घेतली. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय याचा अंदाज कुणालाच येत नाही.
Sudhir Mungantiwar Delhi Visit : आधी मुनगंटीवारांची दिल्ली भेट
सुधीर मुनगंटीवार शनिवारी अमित शाहांच्या भेटीला पोहोचले. आपण मंत्रिपदासाठी किंवा कोणतीही पदे मिळावीत म्हणून दिल्ली दौरा केलेला नाही. राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच ही भेट घेतली आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
अमित शाहांची भेट घेऊन मुनगंटीवर हे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनाही भेटले. त्यामुळे मुनगंटीवार फक्त राज्यातले प्रश्न घेऊन दिल्लीला गेले असतील का? असा प्रश्न अनेकांना पडला.
Hansraj Ahir News : हंसराज अहिरही दिल्लीश्वरांच्या दारी
सुधीर मुनगंटीवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर चंद्रपुरातले भाजपचे आणखी एक मोठे नेते दिल्लीत पोहोचले आणि त्यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची भेट घेतली. ते नेते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर.
खरं तर एकाच पक्षात असून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद आहेत. अनेकदा ते जाहीरपणे दिसूनही आलं आहे. चंद्रपूर भाजपमध्ये गेल्या तीन दशकांपासून शोभाताई फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत.
शोभाताई सध्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यामुळे चंद्रपुरात अहिर विरुद्ध मुनगंटीवार गटाच्या राजकारणानं गेल्या काही वर्षात चांगलाच जोर पकडल्याचं दिसतंय. दोन नेत्यांमधल्या या संघर्षामुळे निवडणुकीतही भाजपला अनेक वेळा याचा फटका बसला आहे.
Sudhir Mungantiwar Vs Hansraj Ahir : मुनगंटीवार-अहिर संघर्ष नेमका काय आहे?
- 1994 च्या सुमारास अहिर आणि मुनगंटीवार यांची राजकारणात एन्ट्री.
- सुरुवातीला दोन्ही नेत्याचं एकत्र काम, कालांतराने मतभेद झाले.
- मुनगंटीवार मदत करत नाहीत असा चार वेळा खासदार राहिलेल्या अहिरांचा आरोप.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांच्या बल्लारपुरात अहिर मोठ्या मतांनी पिछाडीवर पडले.
- 2024 मध्ये अहिरांच्या जागी सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली.
- मुनगंटीवारांच्या पराभवाला भाजपमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचा ठपका.
- विधानसभेत मुनगंटीवार विजयी झाले. मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही.
- मुनगंटीवार-अहिर संघर्षामुळे भाजपमधील जुन्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची कोंडी होताना दिसतेय.
आता सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिरांच्या दिल्लीतील बड्या नेत्याशी झालेल्या गाठीभेटींमुळे चंद्रपुरात काही वेगळंच शिजतंय का? दोन्ही नेत्यांमधला संघर्ष कोणतं टोक गाठणार? की पक्षातील वरिष्ठ मंडळी या संघर्षाला पूर्णविराम देणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
ही बातमी वाचा:
























