Maya Tigress: DNA रिपोर्टवरून होणार माया वाघिणीच्या मृत्यूची खातरजमा; सांगाड्याचे नमुने बंगळुरुला रवाना
Tadoba Andhari Maya Tigress : ऑगस्ट महिन्यापासून माया वाघीण गायब असून तिच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. अशातच एका ठिकाणी वाघाचा सांगाडा मिळाला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba Andhari Tiger Reserve) सेलिब्रिटी वाघीण अशी जगभर ओळख असलेल्या मायाच्या मृत्यूची (Tadoba Maya Tigress Death) बाब डीएनए रिपोर्टवरून सुनिश्चित केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून माया वाघीण ही बेपत्ता आहे. एका ठिकाणी एका वाघाचा सांगाडा सापडल्याने मायाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सांगाड्याचे नमुने बंगळुरूला पाठवण्यात आले आहेत.
मायाच्या शोधसाठी वनविभागामार्फत सातत्याने सर्च मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र असे असले तरी वन विभागाच्या शोध मोहिमेला काही केल्या यश न आल्याने मायाचा मृत्यू झाला असावा ही शक्यता बाळावली होती. याच शक्यतेला दुजोरा देणारी बाब ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कंपार्टमेन्ट क्रमांक 82 मध्ये सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाच्या अवशेषाने अधिक घट्ट झाली आहे. आढळून आलेले वाघाच्या मृतदेहाचे अवशेष नेमके माया वाघिणीचांच आहे का? या बाबत खातरजमा करण्यासाठी वन विभागाच्या वतीने या वाघाच्या सांगाड्याचे नमुने बंगलोर येथील सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र (Centre for Cellular and Molecular Biology) येथे पाठविण्यात आले आहे. या डीएनए रिपोर्टवरूनच माया वाघिणीच्या मृत्यूची खातरजमा होणार आहे.
दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचा अंदाज
गेली अनेक महिने बेपत्ता असलेल्या जगप्रसिद्ध अशा माया वाघिणीच्या ( Maya Tigress) अचानक गायब होण्याच्या वृत्तामुळे वनविभाग एकदम अॅक्शन मोडवर आले होते. दरम्यान वन विभागाच्या वतीने अनेक शोधमोहीम आखून गस्त घालण्यात येत होते. मात्र माया वाघिणीचा काही केल्या सुगावा लावण्यास वन विभागाला यश मिळत नव्हते. परिणामी मायाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता जोर धरू लागली होती. अश्यातच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कंपार्टमेन्ट क्रमांक 82 मध्ये जवळपास 100 मीटर परिसरात एक वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते.
30 नोव्हेंबर पर्यंत होणार शिक्कामोर्तब
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही वाघीण जगप्रसिद्ध असून तिचे जगभरात लाखो चाहते आहे. माया वाघीण ही ताडोबाच्या मुख्य क्षेत्राच्या पांढरपवनी भागातील वाघीण आहे. क्वीन ऑफ ताडोबा असलेल्या मायाचे सोशल मिडियावर लाखो फोटो आणि व्हिडीओ आहेत. सध्या तीचे वय 13 वर्ष असून आजवर तीने पाचवेळ शावकांना जन्म दिला. ज्यामध्ये तिच्या 13 शावकांचे ताडोबातील वाघांची संख्या वाढविण्यास मोठे योगदान राहिले आहे.
सन 2010 मध्ये लीला फिमेल आणि हिलटॉप मेल यांच्यापासून मायाचा जन्म झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्या पासून माया वाघीण न दिसल्याने जगभरातील तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच सापडलेल्या सांगाड्यास्थळी कोणताच मानवी हस्तक्षेप नसल्याने मायाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता बळावली आहे. अंदाजे 30 नोव्हेंबर पर्यंत DNA रिपोर्ट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: