Chandrapur Doctors : जर्मनीत आयोजित 'आयर्नमॅन'मध्ये चंद्रपूरच्या डॉक्टरांचा डंका
शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक कणखरपणा यांची कठीण परीक्षा समजली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा (Ironman Triathlon Germany) जर्मनीतील ड्युसबर्ग येथे दरवर्षी आयोजित केली जाते.
चंद्रपूरः जर्मनीतील ड्युसबर्ग ( Germany Duisburg) शहरात आयोजित आयर्नमॅन या स्पर्धेत चंद्रपुरातील 8 डॉक्टरांनी आपला यशस्वी सहभाग नोंदवत आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूचं (Chandrapur) नाव गाजवलं आहे. 'आयर्नमॅन' ही ट्रायथलॉन स्पर्धा अतिशय नावाजलेली असून या स्पर्धेत 1.91 किलोमीटर पोहणे, 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे असे प्रकार होते. हे तिन्ही प्रकार 8.30 तासांच्या कालावधीत पूर्ण करीत चंद्रपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्नित 8 डॉक्टरांनी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. थेट जर्मनीत चंद्रपूरचे नाव उंचविणाऱ्या या डॉक्टरांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सहनशक्ती, मानसिक कणखरपणाची कठीण परीक्षा
शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक कणखरपणा यांची कठीण परीक्षा समजली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा (Ironman Triathlon Germany) जर्मनीतील ड्युसबर्ग येथे दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षी या स्पर्धेत चंद्रपुरातील डॉ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. रिजवान अली शिवजी, डॉ. नबा शिवजी, डॉ. अभय राठोड आणि पोलिस कर्मचारी श्रीपाद बल्की यांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील 9 महिन्यांपासून खडतर प्रशिक्षण घेतले. पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही प्रकारात सर्व डॉक्टरांनी कसून सराव केला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व स्पर्धक रवाना झाले.
...अन् डॉक्टरांनी चॅलेंज केले पूर्ण
29 ऑगस्टला ही स्पर्धा पार पडली. त्यात या सर्व डॉक्टरांनी 1.91 किलोमीटर पोहणे (Swimming), 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे असे प्रकार 8.30 तासांत पूर्ण करीत पुरस्कार पटकाविला. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या कोणत्याही शाखेने एवढ्या मोठ्या संख्येने या स्पर्धेत आजपर्यंत सहभाग नोंदविला नाही. परंतु यावर्षी एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी होत चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आणि चंद्रपूरच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा रोवला. 'आयर्नमॅन' ही ट्रायथलॉन यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन सह अनेक संस्थांच्या वतीने या स्पर्धक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आहे. डॉक्टर हे आपला व्यवसाय सांभाळून स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत करतात हे या स्पर्धेमुळे सर्वांच्या समोर आलंय. नेहमी लोकांना व्यायाम करा आणि फिट राहा हा संदेश देणारे डॉक्टर स्वतः फिट राहण्यासाठी इतकी मेहनत घेत असेल तर इतरांनी देखील त्यांचं अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या