(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून महिलांची होणार नेमणूक, ड्रायव्हर म्हणून महिलांना संधी देणारा ताडोबा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प
व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून तर संधी मिळेलच सोबतच अनेक शासकीय विभागांमध्ये आणि खाजगी आस्थापनांमध्ये देखील ड्रायव्हर म्हणून संधी उपलब्ध होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात लवकरच जिप्सी चालक म्हणून महिला चालकांची नेमणूक होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची महिलांना संधी देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे.हातात जिप्सीच स्टेअरिंग... चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि मनात काहीतरी करून दाखविण्याचा दृढ आत्मविश्वास ... हे चित्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या अनेक दुर्गम गावातलं आहे. कारण या गावातील महिलांनी पुरुषांची मत्तेदारी असलेल्या एका क्षेत्रात आता मोठ्या आत्मविश्वासाने आपली जागा निर्माण करण्यासाठी पाऊल उचललं आहे.
जिप्सी ड्राईव्हरचं प्रशिक्षण देण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली, सीताराम पेठ, खुटवंडा, मुधोली या सारख्या नऊ गावातील महिलांचे अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जांपैकी 84 महिलांची निवड करण्यात आली आणि यातील 30 महिलांचं पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या सर्व जिप्सी ड्रायव्हर पुरुष आहेत तर गाईड म्हणून जवळपास 25 महिला अतिशय उत्कृष्ट पणे आपलं कर्तव्य बजावत आहेत. या प्रशिक्षणामुळे या महिलांना व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून तर संधी मिळेलच सोबतच अनेक शासकीय विभागांमध्ये आणि खाजगी आस्थापनांमध्ये देखील ड्रायव्हर म्हणून संधी उपलब्ध होणार आहे.
ताडोबाचे गाईड गिरवणार इंग्रजीचे धडे
ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आपल्या राज्यातीलच नाही तर जगाच्या नकाशावर अतिशय लोकप्रिय असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळेच वर्षभर ताडोबा हे देशी-विदेशी पर्यटकांनी गजबजलेला असतो. ताडोबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे देश-विदेशातून इथे पर्यटक येतात. मात्र दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मराठी व हिंदी येत नसल्याने स्थानिक गाईड त्यांना ताडोबाची माहिती देऊ शकत नाहीत. हीच अडचण ओळखून पर्यटकांना टायगर सफारी घडविणाऱ्या गाईड्ससाठी आता ताडोबा प्रशासनाच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे विशेष क्लास सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, या पूर्वी म्हणजे 2020 ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गाईडची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आली होती. यासोबतच मराठी आणि हिंदी भाषेसोबतच इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक केलं आहे. देशी-विदेशी पर्यटकांशी योग्य संवाद साधला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात वाढ
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. बफर झोनमधील सफारीसाठी नवीन वाढीव दर एक जुलैपासून लागू होणार आहेत. तसेच, कोर झोनमधील सफारीसाठीही दर वाढवण्याचा प्रस्तावर तयार करण्यात आला आहे. जुन्या दरानुसार सफारीसाठी चार हजार रुपये आकारले जायचे. आता एक जुलैपासून 5300 रुपये आकारले जाणार आहेत. 2016 पासून ताडोबाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली नसल्याने, ही वाढ करण्यात आल्याच ताडोबा प्रशासनाकडून सांगण्यात आलय.