Chandrapur News : पोहायला गेलेली तीन मुले बुडाल्याची शंका, तलावाजवळ चप्पल आणि कपडे आढळले
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पोहायला गेलेली तीन मुलं तलावात बुडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तिन्ही मुलं दहा वर्षांची असून एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे.
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये (Chandrapur) पोहायला (Swimming) गेलेली तीन मुलं तलावात बुडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात (UltraTech Cement Limited) ही काल (26 जानेवारी) घटना घडली आहे. तिन्ही मुलं दहा वर्षांची असून एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे.
तलावाजवळ चप्पल आणि कपडे आढळले
काल प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आले. त्यामुळे त्यांचा तलावात शोध घेण्यात आला. परंतु रात्री शोध न लागल्यामुळे सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली.
अंधारामुळे रात्री थांबवलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्हा सुरु
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात नाल्याचे पाणी अडवण्यासाठी लहान तलाव निर्माण करण्यात आला होता. या तलावात तिन्ही मुलं बुडाल्याची माहिती मिळत आहे. या तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला बोलावण्यात आलं. रात्री या परिसरात गडद अंधार असल्यामुळे शोधमोहीमेत अडथळे येत होते. शिवाय अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडूनही लाईटच्या व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे रात्री त्यांचा शोध थांबवून आज सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरु करण्यात आली.
तिन्ही मुले एकाच शाळेत शिकत होते
दरम्यान ही तिन्ही मुले सिमेंट कंपनीमधील अधिकाऱ्यांची असून त्यांचे वय दहा वर्षे असल्याचं समजतं. तसंच तिघेही एकाच शाळेत शिकत असल्याचं कळतं. यु्द्धपातळीवर या मुलांचा शोध घेतला जात आहे.
मकरसंक्रांतीलाच वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या आवळी घाटावर मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या 22 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 15 जानेवारी रोजी घडली होती. संदर्भ भैसारे असं या मृत तरुणाचं नाव होतं. तो पिंपळगाव इथला रहिवासी होता. संदर्भ भैसाहे हा गावाती काही मित्रांसोबत आंघोळीसाठी आवळी घाटावर गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास नदी पात्रात काही मित्र उतरुन आंघोळ करत होते. परंतु संदर्भला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. वैनगंगा नदीच्या आवळी घाटावर मकरसंक्रांतीच्या निमित्त गावकरी पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी करतात.
हेही वाचा
Palghar : दुर्दैवी! पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना