Chandrapur News: चंद्रपुरात इरई नदीत दूषीत पाणी, प्रदूषीत पाण्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा खंडित
गेल्या दोन दिवसांपासून इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषीत पाणी येत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेने दाताळा येथील इंटेक वेल बंद केली आहे
चंद्रपूर: इरई नदीचं पाणी प्रदूषित झाल्यामुळे चंद्रपूर (Chandrapur News) शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्याची नामुष्की चंद्रपूर महानगरपालिकेवर ओढावली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे.नदी म्हणजे जीवन आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रदूषणामुळे इरई नदीचं पाणी गढूळ झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषीत पाणी येत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेने दाताळा येथील इंटेक वेल बंद केली आहे आणि त्यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के भागाचा पाणीपुरवठा काल पासून बंद आहे.
नदीचं पाणी प्रदूषीत असल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा बंद करून आपले हात झटकले. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी इरई नदीमध्ये प्रदूषीत पाणी सोडणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राविरोधात आवाज बुलंद केला आहे. इरईमध्ये चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशननेच प्रदूषीत पाणी सोडल्याचा सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आरोप केला आहे. चंद्रपूर शहरातून जाणारी इरई नदी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून उगम पावते. मात्र चंद्रपूर शहराजवळ असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून अनेक प्रदूषणकारी घटक या नदीत सोडले जातात.
प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत इरई नदीतून आणि चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून निघणाऱ्या रानवेंडली नाल्यातून प्रदूषित पाण्याचे नमुने गोळा केले आहे.सरकारी उद्योग असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात सिंहाचा वाटा आहे. यासाठी त्यांच्यावर अनेकदा दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र आता तर प्रदूषणामुळे चंद्रपूर शहरातील लोकांचं पाणी देखील बंद करण्या इतपत वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी सरकारने या प्रदूषणावर कायम स्वरूपी तोडगा काढावा हीच अपेक्षा आहे.
कारवाई करण्याचं आश्वासन
चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन मुद्दा यांनी आज इरई नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. इरई नदी प्रदूषीत झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दाताळा येथील इंटेक वेलवरून पाण्याची उचल बंद करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इरई नदीतून प्रदूषीत पाण्याचे नमुने गोळा करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे इरई नदीत प्रदूषीत पाणी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ने सोडल्याचा सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी इरई नदी आणि रानवेंडली नाल्याची पाहणी केली आणि MPCB च्या रिपोर्टनंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.