(Source: Poll of Polls)
Chandrapur : शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ, भद्रावती तहसील कार्यालयात विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
Chandrapur Farmer Suicide : कोर्टाचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागूनही गेली दोन वर्षे जमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयातून टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग निवडला.

चंद्रपूर : प्रशासनाच्या निर्ढावलेपणाचा, मुजोरीपणाचा आणि चिरीमिरीसाठी गरीब शेतकऱ्यांची कामं थांबवणाऱ्या वृत्तीचा आणखी एक बळी गेला आहे. चंद्रपुरातील भद्रावती तहसील कार्यालयात (Chandrapur Bhadravati Tehsildar Office) विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी परमेश्वर मेश्राम यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात परमेश्वर मेश्राम यांचा मृत्यू झाला. जमिनीचा फेरफार नोंद करण्यास तहसील कार्यालयातून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने मेश्राम यांनी 26 सप्टेंबरला तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
भद्रावती तहसील कार्यालयातील प्रशासनाच्या नालायकपणाला कंटाळलेल्या परमेश्वर मेश्राम यांनी कार्यालयातच विष प्राशन केलं. त्यानंतर अत्यवस्थ असलेल्या मेश्राम यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. मात्र अखेर 10 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जमिनीचा फेरफार जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही आणि शेतीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची कुटुंबीयांची भूमिका आहे.
Chandrapur Farmer Suicide : फेरफारास दोन वर्षे टाळाटाळ
भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन आहे. या जमिनी बाबत कोर्टात केस सुरू होती. मात्र या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.
या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. मात्र मेश्राम यांच्या मृत्यूमुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:



















