Chandrapur Accident : महिला शेत मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; 3 महिलांचा जागीच मृत्यू
Chandrapur Accident : या अपघातात आणखी 13 महिलांसह गाडीचा चालक देखील जखमी झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Chandrapur Accident : शेती कामासाठी आलेल्या महिला घरी परत जात असतानाच त्यांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा अपघात (Accident) झाल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात उमरेड तालुक्यातील सिर्सी चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. तसेच या अपघातात आणखी 13 महिलांसह गाडीचा चालक देखील जखमी झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे तिघीही रा. खरबी (माहेर) ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर अशी मृत महिलांची नावं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी येथील महिला वायगाव (गोंड) ता. उमरेड येथील शुभम राऊत यांच्या शेतात चना कटाईसाठी आल्या होत्या. दिवसभर शेतातील काम केल्यावर एकूण 17 महिला पुन्हा आपल्या गावाकडे निघाल्या होत्या. टाटा सुमो गाडीमध्ये बसून त्या आपल्या गावाकडे निघाल्या असतानाच सालेभट्टी गावाजवळील अचानक वळण मार्गांवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग असल्याने गाडी पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की गाडी थेट एका झाडाला जाऊन आदळली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी वाहनं थांबवून तात्काळ अपघातग्रस्त महिलांना मदत केली. मात्र, यात रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस दाखल...
अपघाताची माहिती नागरिकांनी त्वरित स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास केला जात आहे.
जखमी महिलांची नावं...
तन्वी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत आडकिने, सोनाबाई सिंधू दुके, संध्या संतोष बाळगे, सरिता विजय नागपुरे, मनोरमा शांताराम मेश्राम, सावित्री बिसन आडकीणे, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अर्जुन बागडे व वाहनचालक शंकर मसराम हे जखमी झाले आहेत.
गावकरी मदतीला आले धावून...
महिला शेत मजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकीचा सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील गावकरी घटनास्थळी धावून आले. गावकऱ्यांनी अपघातग्रस्त गाडीतून जखमी महिलांना बाहेर काढले. तसेच पोलिसांना माहिती देऊन सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल. अचानक झालेल्या अपघातामुळे जखमी महिला प्रचंड घाबरून गेल्या होत्या. दरम्यान, मदतीला धावून आलेल्या गावकऱ्यांनी त्यांना धीर देत मदतही केली.
इतर महत्वाच्या बातम्या :
परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना चिरडले; दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेतून भीषण अपघात