Chandrapur News : शेतकरी विषप्राशन प्रकरण भोवलं; चंद्रपूरच्या भद्रावती तहसीलदारसह नायब तहसीलदावर निलंबनाची कारवाई
Chandrapur News : भद्रावतीचे तहसीलदार (Tehsildar) राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार (Naib Tehsildar) सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Chandrapur News : भद्रावतीचे तहसीलदार (Tehsildar) राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार (Naib Tehsildar) सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने हे निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहे. परमेश्वर मेश्राम या 55 वर्षीय शेतकऱ्याने मागील शुक्रवारी भद्रावती (Bhadrawati) तहसील कार्यालयात विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शेतजमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याने कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मेश्राम यांची भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे 8.5 एकर वडिलोपार्जित जमीन असून न्यायालयात सुरू असलेली केस त्यांनी जिंकली होती. मात्र तरीदेखील गेल्या दोन वर्षांपासून ते फेरफारसाठी तहसील कार्यालयाचे खेटे मारत होते. अखेर त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी विष घेत जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणी भद्रावती तालुक्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उमटली होती. अखेर प्रशासनाने दोन्ही अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात दोषी मानून निलंबनाची कारवाई केली आहे.
महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणूक? शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान (Farmers cheated by Mahabeej)
बुलढाणा जिल्ह्याच्या वर्दाडा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी आपल्या 10 एकर शेतात महाबीजकडून बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत MAUS - 725 या जातीच्या बियाण्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी महाबीजकडे चालन आणि कागदपत्रांची पूर्तता देखील केली आहे. सोयाबीन बियाणे पेरून साडे तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला. तरीही, महाबीजकडून एकही अधिकारी, कर्मचारी सीड प्लॉट पाहण्यासाठी आला नव्हता.
तत्काळ न्याय आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी (Farmers demand compensation for losses)
मात्र सोयाबीन बियाणे काढण्यावर आले असता महाबीज म्हणतंय की, तुमचा सीड प्लॉट रिजेक्ट झाला असून आम्ही ते सोयाबीन बियाणे घेऊ शकत नाही. कारण आम्ही ज्या MAUS 725 जातीचे सोयाबीन बियाणे दिले होते, ते शेतात नसून दुसरेच जातीचे बियाणे आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यासंदर्भात शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी महाबीज, कृषी विभागसह इतर ठिकाणी तक्रारी केल्या असून तत्काळ न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केलीय. याबाबत मात्र महाबीजचे कुठलेही अधिकारी बोलण्यास तयार नाही.
हेही वाचा























