Nagpur ZP : निवडणुकीसाठी रजा घेऊन प्रचार करा, ऑफलाईन शाळा सुरु असतानाही संघटनेचे शिक्षकांना आवाहन
अनेक शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. तरीही याबाबीकडे लक्ष न देता सर्रास प्रचाराला लागले आहे. काही तर ड्युटीवर प्रचार कार्य करत असल्याची माहिती आहे. शिक्षणाच्या निकालावर याचा परिणाम होईल हे निश्चितच.
नागपूरः जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी शाळेत येत असून शिक्षक मात्र प्रचारात व्यस्त आहे. शिक्षकांशी संबंधित पतसंस्थेची निवडणूक आहे. आपले पॅनल निवडून आणण्यासाठी रजा घ्या, उमेदवारांचा प्रचार करा, असा संदेशच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिला. तर दुसरीकडे निवडणुकीनिमित्त शिक्षकांचे जत्थेच्या जत्थेच शाळेत दाखल होत असल्याने शिक्षणावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या दोन पतसंस्था आहे. यातील एका पतसंस्थेसाठी दोन आठवड्यांनी आहेत. निवडणुकीत दोन पॅनल उभे आहेत. आपल्याच पॅनलमधील उमेदवार निवडणून यावे, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जीवाचे रान करण्यात येत आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन करायचे असल्याने आपले पॅनल निवडून आणा. त्यासाठी रजा घ्या, जोरात प्रचार करा, असा संदेशच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात येत आहे. आधीच शिक्षकांची संख्या कमी असल्याची ओरड होत आहे. कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचा आहे. दुसरीकडे शिक्षक निवडणुकीत व्यवस्त आहेत. यासाठी अनेकांनी सुटी टाकली असून, काहीजण आता अर्ज करण्याच्या तयारीत आहे. प्रचारासाठी शिक्षकांचे जत्थेच्या जत्थे शाळेला भेटी देत असून, उमेदवाराला मतदार करण्यास सांगत आहे. यामुळे शालेय शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.
दोन्ही पॅनलमध्ये सत्ताधारी
17 पदांसाठी निवडणूक होत आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडली असून, दोन्ही पॅनलमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.
विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर
अनेक शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. विद्यार्थी व वर्गाच्या तुलनेत ही संख्या तोकडी आहे. तरीही शिक्षक याबाबीकडे लक्ष न देता सर्रास प्रचाराला लागले आहे. अनेकांनी सुट्ट्यांचे अर्ज भरुन प्रचार सुरु केले तर काही तर ड्युटीवर प्रचार कार्य करत असल्याची माहिती आहे. निवडणूकीचा निकाल काहीही असो मात्र शिक्षणाचा निकालावर याचा परिणाम होईल हे निश्चितच.
शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षा याच महिन्यात होणार असल्याची माहिती आहे. सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षात बसविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी यात उत्तीर्ण व्हावे, यासाठी त्यांची सराव परीक्षा घेण्याचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी निश्चित केले आहे. परंतु शिक्षक निवडणुकीत व्यस्त असल्याने यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीईओ याबाबत काय निर्णय घेतात, याकडेच अनेकांचा लक्ष लागले आहे.