शरद पवारांनी आणखी एक डाव टाकला, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र शिंगणेंविरोधात पुतणीलाच मैदानात उतरवणार?
Gayatri Shingne vs Rajendra Shingne : डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने सिंदखेडराजा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत.
सिंदखेडराजा : गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr Rajendra Shingne) हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र सिंदखेडराजा तालुक्याचा अद्याप कुठलाही विकास झाला नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात प्रवेश केल्याने सिंदखेडराजा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत. या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिले आहे. त्यामुळे काकांविरोधात पुतणी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.
तहसील कार्यालयावर मोर्चा
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात काल मोर्चा काढण्यात आला. पिक विमा मिळावा, पिक कर्ज , नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा काढून गायत्री शिंगणे यांनी आपले काका डॉ. राजेंद्र शिंगणे यांना जोरदार आव्हान निर्माण केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत?
दरम्यान, सिंदखेडराजा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन नावे समोर आली आहेत. परंतु, या दोन्ही नावांनी अद्याप तरी पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मराठा लॉबीतली एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिले जात आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण करायला सुरूवात केली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना त्या हजर राहत आहेत. गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत या सिंदखेडराजा तालुक्याचा कुठलाही विकास झाला नाही. हा विकास व्हावा यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. गायत्री शिंगणे यांनी आता निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा