Gajanan Maharaj Prakat Din 2023 : संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन, शेगावात भक्तांची मांदियाळी
Gajanan Maharaj Prakat Din 2023 : श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे.
Gajanan Maharaj Prakat Din 2023 : श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din) आहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील (Buldhana) शेगावात (Shegaon) लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. संत गजानन महाराज 1878 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी शेगाव इथे पहिल्यांदा दिसून आले होते. राज्यभरातील आणि शेजारील मध्य प्रदेशातील तसंच गुजरातमधून सुद्धा जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. सकाळी सात वाजता आरतीने या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. केवळ शेगावातच नव्हे तर संत गजानन महाराज यांचे मठ असलेल्या राज्यातील विविध ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन आजच्या दिवशी केले जाते.
गजानन महाराजांमुळे शेगाव नावारुपाला
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराज यांच्यामुळे नावारुपाला आले आहे. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही. परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकटले होते. त्याठिकाणी त्यांनी आपलं जीवन शेगाववासियांच्या सहवासात घालवलं. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो.
हजारो भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल
श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात. महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. महाराजांच्या प्रकट दिनी हजारो भक्त, लोक शेगाव इथे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावतात. हे सर्व भाविक पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान यांमध्ये विशेष सहभाग नोंदवतात.
VIDEO : Shegaon : Gajanan Maharaj Mandir : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगावात मंदिराला विद्युत रोषणाई