मोठी बातमी! रविकांत तुपकरांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; रेल्वे रोखण्याचा प्रयत्न
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर (Sharvari Tupkar) यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्टेशनवर आज सकाळी आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्याकडून मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. असे असतांना रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर (Sharvari Tupkar) यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्टेशनवर आज सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 19 तारखेपासून मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला होता. त्यामुळे आंदोलनाच्या एक दिवस आधीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर आजचे आंदोलन होणार की नाही अशी चर्चा सुरु होती. मात्र, आज सकाळीच रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर या मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोखो आंदोलन करण्यासाठी पोहचल्या. त्यानंतर शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी तैनात असलेल्या पोलिसांकडून शर्वरी तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी...
रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गनिमी कावाने त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. यावेळी आज सकाळीच शेकडो सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवर पोहचले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे रोखण्यासाठी असंख्य शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्याने पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तसेच याचवेळी रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
रविकांत तुपकरांना एकदिवस आधीच अटक...
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून सतत आंदोलने करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मात्र, त्यानंतर देखील सरकारकडून आपल्या मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी 19 जानेवारीला दिल्ली-मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रोखणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनाच्या एक दिवस आधीच बुलढाणा पोलिसांकडून तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: