(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : लम्पीमुळे संपूर्ण राज्यात जनावरे दगावण्याचं प्रमाण बुलढाण्यात सर्वाधिक, आतापर्यंत 3993 गुरे दगावली
लम्पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जनावरांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झाला आहे. महाराष्ट्र राज्यात 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यात जनावारांना लंपीची प्रचंड लागण झाली असून हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळाले नाही. राज्यात सर्वात जास्त जनावरे दगावण्याचे प्रमाण बुलढाणा जिल्ह्यात असून आतापर्यंत 3993 गुरे लंपी आजाराने दगावली आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत.
मागील 4 महिन्यापासून आतापर्यंत 41 हजार 891 जनावरे लंपी आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे धन म्हणजे गाय बैल आहे. त्यांच्यावर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून आता लंपी आजाराने शेतकऱ्याजवळ असलेलं पशुधन दगावत असल्याने बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे.
जिल्ह्यात लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशु संवर्धन विभाग सज्ज असून आतापर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र लम्पी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापपर्यंत यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त जनावरे दगावले असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पशुपालकधारकांनी जनावरांचे लवकरात लवकर लसीकरण करावे असे आवाहन पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ प्रवीण कुमार घुले यांनी केले आहे.
जनावरांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन
लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं जर गायीचा मृत्यू झाला तर राज्य सरकारकडून पशुपालकांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपये दिले जातात. याशिवाय वासराचा जर मृत्यू झाला तर 16 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. लम्पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जनावरांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.या आजारात जनावरांना ताप येतो.जनावरांच्या पूर्ण शरीरावर गाठी येतात.सुखद बाब म्हणजे या आजारात जनावर दगावण्याची शक्यता नाही सारखीच आहे.नवापूर तालुक्यात सर्वत्र या आजाराने थैमान घातले आहे