Swabhimani Shetkari Saghtana : पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी एकत्र या, तुपकरांचं आवाहन, सहा नोव्हेंबरला स्वाभिमानीचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा
राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
Swabhimani Shetkari Saghtana : राज्यातील सोयाबीन (Soyabean) आणि कापूस (Cotton) उत्पादकांच्य प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) चांगलीच आक्रमक झाली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. दरम्यान, पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र या असं आवाहन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं आहे.
रविकांत तुपकरांच्या गावा-गावात बैठका
दरम्यान, सहा नोव्हेंबरला होणाऱ्या एल्गार मोर्चाची संपूर्ण जिल्हाभर तयारी सुरु आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर हे सध्या ठिक-ठिकाणी शेतकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह रविकांत तुपकर हे गावागावात जात आहेत. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. सहा नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चासाठी त्यांना विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हातात रुम्हणं घ्यायचं...अन् दुपारी मोर्चात यायचं...
सहा नोव्हेंबरला जगदंबा माता मंदिर चिखली रोड बुलढाणा ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काडण्यात येणार आहे. या मोर्चात हातात रुम्हणं घ्यायचं... अन् दुपारी मोर्चात यायचं...असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं आहे. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे बहुतांश अर्थकारण हे सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. सध्य परिस्थितीत सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची व त्यांच्या हक्कासाठी पेटून उठण्याची नितांत गरज असल्याचे तुपकरांनी सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या घेवून बुलढाण्यात मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
अतिवृष्टीचा मोठा फटका
परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अन् डोळ्यातही पाणी आहे. अतिशय विदारक आणि मनाला चटका लावणारे दृष्य सर्वत्र दिसून येत आहे. आकधीही भरुन न निघणारे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे आवश्यक असल्याचेही तुपकर यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध कधीही फुटू शकतो. शेतकरी आणि युवकच काय महिलांच्याही भावना देखील तीव्र आहेत. घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू आणि रोषही आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. पण कुणीही खचून जाऊ नये, आपण रडून-हरुन मरण्यापेक्षा लढून मरू... संघर्षासाठी सज्ज व्हा..! असे आवाहन तुपकरांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: