Eknath Shinde : "जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही"; बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Eknath Shinde : बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील घटनेवर भाष्य केलं आहे.

बुलढाणा : जालन्यातील (Jalna) घटनेमुळे मलाही दु:ख झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्र डागलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, "ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत' अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.
"मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू"
मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. "फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत." जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
योग्य चौकशी होणार : मुख्यमंत्री
दरम्यान जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर गरज पडली तर न्यायालयात देखील जाण्याची आमची तयारी आहे', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.
मराठा समाज संयमी : मुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये अशोक चव्हाण होते त्यांनी तेव्हा काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक चव्हाणांना विचारला आहे. तर महाविकास आघाडीने एकदाही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटंल आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मराठा समाजाचे लाखो संख्येने मोर्चे निघायचे. पण या मोर्चाचा कधी कुणाला त्रास झाला नाही. त्यांनी कधीच कुणाला त्रास होऊ दिला नाही. मराठा समज हा फार संयमी आहे. मराठा समाजाच्या मुकमोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही."
"3,500 तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं"
जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं तेव्हा 3,500 तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांची निवड झाली होती पण नियुक्ती पत्र आली नव्हती. त्यावेळी मात्र सर्वांनी माघार घेतली. कारवाई होईल म्हणून सगळ्यांना पाठ फिरवली. मी तेव्हा म्हटलं की काहीही होऊ दे पण मी मागे हटणार नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर त्या 3,500 तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, फडणवीस हे लडाखमध्ये गेले आहेत आणि अजित पवारांची तब्येत बरी नाही. त्यामुळे दोघांनाही यायला जमणार नाही. पण काहीही झालं तरी आमचं सरकार घट्ट आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
