(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मला तुमच्या घरचं जेवण हवं', गजानन महाराजांच्या वेशभूषेत मागणी; महाराज प्रकटल्याच्या भावनेने संपूर्ण जिल्हा सुटाळपुरात
संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होते. मात्र ही व्यक्ती कोण आहे? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही.
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील खामगाव येथील सुटाळपुरा परिसरात गजानन महाराज (Gajanan Maharaj) प्रगटल्याची बातमी पसरली आणि या परिसराला अक्षरशः भक्तांनी यात्रेच स्वरूप दिलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सुटाळ पुरा परिसरात अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरात गजानन महाराज प्रगटल्याची माहिती परिसरात पसरली. बघता बघता ही माहिती संपूर्ण खामगाव शहरात पसरली आणि सातव यांच्या घराभोवती भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली. कुणी हार फुल घेऊन आले तर कुणी प्रसाद... बघता बघता या परिसराला यात्रेचा स्वरूप प्राप्त झाले. बराच वेळ ही हुबेहूब गजानन महाराजांसारखी दिसनारी ही व्यक्ती सातव कुटुंबाच्या घरी होती..... शेवटी पोलिसांना ही पाचारण करावे लागलं.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून अचानक आली. मला तुमच्या घरी जेवण करायचं असे सातव यांच्या घरातील महिलांना या व्यक्तीने म्हटले. या व्यक्तीने गजानन महाराज यांच्यासारखी वेशभूषा केली कुटुंबीयांनी ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर ही व्यक्ती गजानन महाराजच आहे अशी माहिती परिसरात पसरली. समाज माध्यमात क्षणात काही फोटो , व्हिडिओ व्हायरल झाले. या ठिकाणी बघ्याची व भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.
रात्रभर परिसरात भक्तांची गर्दी
संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होती. मात्र ही व्यक्ती कोण आहे? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. रात्रभर या परिसरात अशीच भक्तांची गर्दी दिसून आली. सकाळी मात्र याच परिसरात राहणाऱ्या धनंजय वाजपे नावाच्या पत्रकारांनी या व्यक्तीला शेगाव रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिल्याची माहिती स्वतः वाजपे यांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यानंतर एबीपी माझाने या बाबतीत शेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही तपासून बघितले असता कुठेही गजानन महाराजसारखी दिसणारी व्यक्ती मात्र नंतर आढळून आली नाही.
विदर्भाची पंढरी म्हणून शेगाव प्रसिद्ध
विदर्भाची पंढरी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव प्रसिद्ध आहे. श्रीसंत गजानन महाराज हे 145 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. राज्यभरातून हजारो भाविक येथे वर्षभर येत असतात.