Buldhana Accident: माहेरून परत येताना वाटेतच भीषण अपघात; कारला लागलेल्या आगीत 5 महिन्यांची गर्भवती जागीच ठार
वर्षभरापूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झालं होतं .महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं नंतर समोर आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Buldhana Accident: माहेरी गेलेल्या गर्भवती पत्नीला घेऊन येताना जळगाव छत्रपती- संभाजीनगर मार्गावर वाकोद गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. यात पती जखमी झाला आहे. टायर फुटून कार दुभाजकावर आढळल्याने सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की दुभाजकाला आदळताच कार पेटली. स्थानिकांना पतीला बाहेर काढण्यात यश आलं .मात्र पत्नीच्या बाजूची काच न फुटल्याने कार मध्येच होरपळून पत्नीचा मृत्यू झाला . वर्षभरापूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झालं होतं .महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं नंतर समोर आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
Buldhana Accident: नेमकं घडलं काय ?
बुलढाणा जिल्ह्यातील संग्राम मोरे हे पत्नी माहेरी गेली म्हणून तिला घ्यायला भुसावळ तालुक्यातील बोर्डी गावाला गेले होते. परत येत असताना जळगाव - छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाकोद गावानजीक त्यांची भरधाव कार रस्ता दुभाजकावर धडकली . कार आदळल्याने क्षणार्धात आग लागली व यात सीट बेल्ट लावलेला असल्याने कारमधील दाम्पत्य आतच अडकले . बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले . यावेळी जवळच एका घटनेचा पंचनामा करण्यासाठी वाहतूक पोलीस हजर होते. त्यांना अपघाताचा आवाज आल्याने त्यांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेतली व कारमधील दाम्पत्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . मात्र, कारचे काच न फुटल्याने व कारला अचानक आग लागल्याने यात पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. तर उपस्थित पोलीस व स्थानिकांनी कारचा उजव्या बाजूचा दरवाजा तोडून संग्राम मोरे यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आज समोर आला आहे. या दाम्पत्याच एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं व मृत पत्नी जान्हवी ही पाच महिन्यांची गर्भवती होती . मात्र ,या अपघातात दुर्दैवी जान्हवीचा मृत्यू झाला व पती होरपळपून गंभीर जखमी झाला.
जळगाव -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या कारचा अचानक टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि वाहन थेट दुभाजकावर आदळले. धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील चाकाचे भाग दूरपर्यंत उडाले आणि काही क्षणांतच इंजिन भागातून धूर निघू लागला. काही सेकंदांतच कारने पेट घेतला.
























