Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Sharad Pawar : जो जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो, तो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य शरद पवार करतात, अशी टीका भाजपने केली आहे.
नाशिक : संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप (BJP) आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये (Nashik) शरद पवारांविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजप आणि हिंदू संघटनांच्या वतीने आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह साधु-महंतांच्या नेतृत्वात नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर (Kalaram Mandir) शरद पवारांविरोधात निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तान जसं आतंकवादी पोसतात, तसं शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसत असल्याचा दावा तुषार भोसले यांनी केला आहे.
शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका
तुषार भोसले म्हणाले की, जो जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो, तो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. जसा आतंकवाद पाकिस्तान पोसतो, तसा हिंदू विरोधी विचार आणि माणसं शरद पवार पोसतात. आयसीस, पीएफआयसारख्या संघटनांकडून हिंदू धर्माला धोका आहे. तसाच शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका आहे. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य पवार करतात. हिंदू विरोधी वक्तव्य करणारा प्रत्येक माणूस शरद पवारांशीच कसा संबंधित असतो? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका
दरम्यान, शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे (Revti Sule) यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्त्वाचा (Hindutva) अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुद्धी दिली. पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे टीका प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर केली.
आणखी वाचा