Sharad Pawar: पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचा नंबर? शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळणार? काँग्रेसचा इच्छुक उमेदवार पवारांच्या भेटीला, घडामोडींना वेग
Rajesaheb Deshmukh meet Sharad Pawar: बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. त्यांच्या या भेटीकडे परळी मतदारसंघाचं लक्ष्य लागलं आहे.
बीड: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) मराठा कार्ड खेळणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच बीड परळी या भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला. राज्यात मराठा आरक्षणाचा बीड, जालना हा भाग केंद्रबिंदु ठरला होता. त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
अशातच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याबाबत काही निर्णय घेतला तर काही समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे. अशातच परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अशातच शरद पवार आणि राजेसाहेब देशमुख यांच्या भेटीमुळे अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.
राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा?
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपुर्वीत दावा केला होता, मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत ते जनतेशी संवाद साधत आहेत. तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत. महायुती सरकारमध्ये आता त्यांच्याकडे कृषीमंत्री देण्यात आलं आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महायुतीकडून धनंजय मुंडेंनाच परळीतून उमेदवारी देण्यात येईत याबाबत कसलीच शंका नाही. मात्र, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे आता नेमकी संधी कोणाला मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये परळी मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?
महायुतीकडून धनंजय मुंडे फिक्स असतील मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) हे अद्याप कोणताही स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. फुलचंद कराड देखील इच्छुक आहेत. तर रासपाचे युवा माजी प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी पक्ष प्रवेश करून मविआकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंडेंना विधानसभा निवडणूक आव्हान देणारी?
लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचा आश्चर्यकारक पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आरक्षणाचा मुद्दा आणि पक्ष फुटीमुळे पुन्हा आव्हानात्मक जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता धनंजय मुंडे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच आज काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. महाविकास आघाडीत परळी मतदारसंघ कोणाला मिळणाक याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.