Devendra Fadnavis : आधी पालकमंत्रिपदाची इच्छा, आता अनेक विकासकामांचा धडाका; देवेंद्र फडणवीसांकडून गडचिरोलीसाठी मोठ्या घोषणा
गडचिरोलीला लवकरच नवीन एअरपोर्ट आपण देत आहोत. सोबतच आणखी एक सर्वेक्षण करून गडचिरोलीला जल वाहतूक करता येईल का? त्यासाठीचे सर्वेक्षण सध्या सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
गडचिरोली : महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा, नक्षलग्रस्त जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख सर्वत्र निर्माण झाली होती. ती ओळख बदलण्याचा मानस देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला आहे. त्यासाठी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद आपल्याकडेच राहील अशी आशाही त्यांनी यापूर्वी बोलून दाखवली होती. अशातच आता गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अनेक विकासकामांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळाले आहे. गडचिरोलीला लवकरच नवीन एअरपोर्ट आपण देत आहोत. सोबतच आम्ही एक आणखी सर्वेक्षण सुरू केलं असून गडचिरोलीला जल वाहतूक करता येईल का? त्यासाठीचे सर्वेक्षण सध्या सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री आज गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकांशी लोह खनिज प्रकल्पाच्या DRI प्लांटचे उद्घाटन केलं. स्लरी पाईप लाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू ग्राईडींग युनिटचे भूमिपूजन ही त्यांनी आज केलं.
देवेंद्र फडणवीसांकडून गडचिरोलीसाठी मोठ्या घोषणा
दरम्यान, आज स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील (Gadchiroli) गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. त्यामुळे, माओवाद्यांच्या बालेकिल्लातच मुख्यमंत्र्यांनी खास एसटी प्रवास करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. या बससेवेनंतर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून आनंदही व्यक्त केला आहे.
टप्प्याटप्प्याने 25,000 कोटींची गुंतवणूक, हजारो तरुणांना रोजगार
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक जानेवारी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे, नवीन वर्ष गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन पहाट घेऊन आला आहे. अनेक वर्ष गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असल्याचे बोलत होतो. गडचिरोलीचे पूर्ण परिवर्तन करण्याचा प्रयत्न मागील दहा वर्षांपासून सातत्याने करत आहोत. 2018 मध्ये मी जेव्हा या कारखान्याचे भूमिपूजन केले होते, तेव्हा शंका व्यक्त केली होती की भूमिपूजननंतर कारखाना खरोखर स्थापन होईल का? मात्र मला आज आनंद आहे की मुख्यमंत्री म्हणून मी ज्या कारखान्याच्या भूमिपूजन केले आज मुख्यमंत्री म्हणून त्याचे उद्घाटन करत आहे.
या ठिकाणी टप्प्याटप्प्याने 25,000 कोटींची गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. प्रभाकरन यांनी स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष घातले. आज त्यांच्याकडून तब्बल 1000 कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. काम करणारे कर्मचारी कंपनीचे मालक झाले आहे. पुढील पाच वर्षात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या शेअर्सचे मूल्य शेअर बाजारमध्ये अनेक पटीने वाढतील.असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला आहे.
इथे आपण जी मायनिंग करत आहोत, ती स्थानिकांना लुटण्यासाठी नाही, तर स्थानिकांना सबळ बनवण्यासाठी करत आहोत. गडचिरोलीत खाण काम होत असताना मी विश्वास देतो की गडचिरोलीच्या जल, जंगल, जमीनला आम्ही नखही लागू देणार नाही. त्याचे नुकसान होऊ देणार नाही. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा