डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
शेतात निघालेल्या विषारी सापाला पकडत असताना विषारी नाग प्रजातीच्या सापांनं सर्पमित्रालाचं दंश केला.
भंडारा : सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने जमिनीतून साप-नाग (Snake) बाहेर येऊन मोकळा श्वास घेतात. तर, काहीवेळा शेतकऱ्यांच्या शेतात, घराजवळही साप आढळून येतात. त्यामुळे, सर्पमित्रांच्या मदतीने हे साप पकडून त्यांना निसर्ग सानिध्यात सोडले जाते. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी गावातही अशीच एक घटना घडली. मात्र, सापाने सर्पमित्राला दंश केल्यानंतर सर्पमित्राने तोच साप हातात घेऊन थेट रुग्णालयात गाठले. सुदैवाने सर्पमित्राचा जीव वाचला, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती निकवर्तीयांनी दिली.
शेतात निघालेल्या विषारी सापाला पकडत असताना विषारी नाग प्रजातीच्या सापांनं सर्पमित्रालाचं दंश केला. त्यामुळं डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर जखम झालेली असतानाही सर्पमित्रांनं हिम्मत नं हरता सापाला उजव्या हातात पकडून जखमी अवस्थेत आपल्या सहकारी मित्रांसह दुचाकीनं उपचारासाठी रुग्णालय गाठले. दुचाकीवरून आपल्या सहकारी मित्रांसह उपचारासाठी जात असतानाचा व्हिडिओ जखमी सर्पमित्राच्या मागं बसलेल्या मित्रानं आपल्या मोबाईलमध्ये काढला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा थरारक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या सोनी गावात गुरुवारी घडला. उजव्या हातात विषारी साप आणि डाव्या हाताला गंभीर जखम अशा अवस्थेत सर्पमित्र लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचला असताना उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, प्रकृती अत्यवस्थ असल्याने लाखांदूर येथून सर्पमित्राला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले आहे. सध्या सर्पमित्राची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सर्पमित्राजवळ भंडाऱ्यात रात्रभर असलेल्या सापाला आज सकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. विषारी जातीचा साप असल्याने या सापाचा दंश सर्पमित्राच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढावला होता. पण, वेळीच रुग्णालयात दाखल झाल्याने जीव वाचला.
हेही वाचा
झुकेगा नय साला! आरामात कॉफीचा घोट घेतला, बायकोला किस केलं अन् अल्लू अर्जुन पोलिसांच्या स्वाधीन VIDEO