भंडाऱ्यात मटनापेक्षाही मशरूम महाग; बाजारपेठेत 'जंगली मशरूम' घेण्यासाठी नागरिकांची झुंबड, आरोग्यासाठी नेमके फायदे काय?
सध्या भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या बाजारपेठेसह भंडारा शहरातही मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम विक्रीसाठी आले आहेत. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Bhandra News: पावसाळा (Monsoon Updates) सुरू झाला की, बाजारात रानभाज्या येतात आणि त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडल्याचं पाहायला मिळतं. अशात श्रावण सुरू झाला की, लोक मासांहार खाणं टाळतात. त्यात पावसाळ्यात याच वेळेस जंगली मशरूम (Mushroom) विक्रीसाठी येतात. या मशरूमला ग्रामीण भागात 'सात्या' म्हणतात. हे लोकांच्या पंसतीस पडतात. आता भंडाऱ्यातील भाजी बाजारात मशरूम विक्रीसाठी आले आहेत. यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सध्या भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या बाजारपेठेसह भंडारा शहरातही मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम विक्रीसाठी आले आहेत. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति एक पाव 300 रुपये दर असून एक किलो मशरूमसाठी 1000 ते 1200 रुपयांचा दर मिळत आहे. मटनापेक्षाही महाग असलेल्या जंगली मशरूमला सर्वसामान्यांमध्ये मोठी मागणी आहे. भंडाऱ्यातील बाजारात मोठ्या प्रमाणावर मशरुमची विक्री होत आहे. दर मोठा असला तरी, त्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबळ उडतेय. त्यामुळं या मशरूमच्या विक्रीतून लोक चांगल्या प्रकारची कमाई करत आहेत.
जुलै, ऑगस्ट महिन्यात मशरूमला मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेश राज्याची सीमा, भंडारा जिल्ह्याला लागून आहे. भंडाऱ्याचा शेवटचा तालुका असलेल्या तुमसर तालुक्यातून सातपुडा पर्वताच्या रांगा गेल्या असून तिथंच हे मशरुम आढळून येतात. सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये या मशरुमचं नैसर्गिकरित्या मोठं उत्पादन होतं. आता पावसाळ्यात या मशरुमचं सीझन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची आवाक वाढली आहे. नागरिक एक हजार रुपयांपासून 1200 रुपये किलोच्या दरानं मशरूम विकत घेत आहेत. मागील वर्षी पेक्षा यंदा कमी प्रमाणात मशरूम बाजारात येत असल्यानं मशरूमचे दर गगनाला भिडल्याचं बोललं जात आहे. भंडारा जिल्ह्यात 650 रुपये किलो दरानं मटण विकलं जातंय. तर, मशरूम 1000 ते 1200 रुपये किलोच्या दरानं विकले जात आहेत. अशातच खवय्ये मटणापेक्षाही मशरुमकडे वळाल्याचं दिसून येत आहे. केवळ याच मोसमात जंगली मशरूम मिळत असल्यानं नागरिकसुद्धा मशरूम घेण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.
नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात हे मशरूम येतात. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम शोधून एकत्र करतात. त्यानंतर मशरूम स्वच्छ पाण्यानं धुवून त्याला विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. मशरूम हे आरोग्याला पोषक असल्यानं त्याची खरेदी करताना नागरिक दिसतात. पावसाळा सुरू झाला की, मशरूम मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. तसेच बाजारपेठेत देखील त्याला या काळात जास्त मागणी असते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहारी पदार्थ टाळतात. त्यामुळे या काळात मशरूमला मोठी मागणी असते. शरीरासाठी देखील मशरूम पोषक असतात. आयुर्वेदात देखील मशरुमचं मोठं महत्व आहे. त्यामुळेच बाजारात मशरूमला मोठी मागणी आहे.