(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara News : खोदकाम एकाच्या शेतात, मोबदला दुसऱ्याला; गोसीखुर्द धरण प्रशासनाचा भंडाऱ्यात अजब कारभार
Bhandara News : खोदकाम एकाच्या शेतात आणि नुकसानीचा आर्थिक मोबदला दुसऱ्या शेतकऱ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. गोसीखुर्द धरण प्रशासनाचा अजब कारभार उघड झाला आहे.
Bhandara News : शेतकऱ्यांना हरितक्रांतीचं स्वप्न दाखवून भंडारा (Bhandara) जिल्ह्यात महत्त्वकांक्षी गोसीखुर्द धरणाची (Gosikhurd dam) निर्मिती करण्यात आली आहे. आता त्याच धरण प्रशासनाने डाव्या कालव्याच्या वाहिकेचं (वितरिका) काम करताना एका शेतकऱ्याच्या (Farmers) शेतातून काम करताना त्याला साधी माहितीही दिली नाही. त्याच्या शेतातील उभं पीक नष्ट करत खोदकाम केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण इथेचं संपलं नाही, तर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून खोदकाम केलं त्याला वगळून भूसंपादनाचा आर्थिक मोबदला दुसऱ्याचं शेतकऱ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी इथं घडला आहे.
शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान
लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील शेतकरी चंद्रशेखर खटकाटे यांच्याबाबत ही घटना घडली आहे. चंद्रशेखर खटकाटे यांच्याकडे वडिलोपार्जित 40 हेक्टर आर शेती आहे. मागील अनेक वर्षांपासून ते त्या शेतात उत्पादन घेत आहेत. सध्या गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरीकेचे काम सुरू आहे. धरण प्रशासनाने खटकाटे यांच्या वहिवाटीच्या शेतातून त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा उभ्या पिकावर मशीन चालवून खोदकाम केलं. यात खटकाटे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत त्यांनी निन्म पैनगंगा उपसा सिंचन उपविभागाच्या वाही येथील प्रशासनाला विचारणा केली असता, धक्कादायक बाब समोर आली. यात नुकसान खरकाटे यांच्या शेताचं झालेलं असताना, त्याच्या भूसंपादनाचा मोबदला मात्र, दुसऱ्या शेतकऱ्याला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्यासारखी शेती प्रशासनाच्या चुकीमुळं डोळ्यादेखत नष्ट झाली आहे.
कोणताही कल्पना न देता शेतात खोदकाम
गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना चंद्रशेखर खटकाटे यांना धरण प्रशासनाने कोणतीही कल्पना न देता त्यांच्या शेतात खोदकाम केलं आहे. या खोदकामाचा मोबदला मला न मिळता दुसऱ्याच शेतकऱ्याला दिल्याची माहिती खुद्द शेतकरी चंद्रशेखर खटकाटे यांनी सांगितली. उभ्या पिकातून कालव्याचे काम सुरु केले आहे. माझ्या पिकाची त्यांनी भरपाई द्यावी असी मागणी शेतकऱ्याने केली आहे. जमीन एकाची आणि मोबदला दुसऱ्याला दिल्याचा गंभीर प्रकार जेव्हा समोर आला, तेव्हा धरण प्रशासन आता दुसऱ्या शेतकऱ्याला दिलेला आर्थिक मोबदला परत मागण्याचा केविलवाणा प्रकार करीत आहे. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे चंद्रशेखर खरकाटे यांना चांगलाच फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: